सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची त्यावर राजकारणाची पोळी भाजायची हे घृणास्पद आहे, उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले

भाजपच्या मंत्र्यांच्या मुलांनी हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट सामने भरवायचे आणि ते दुबईत जाऊन पाहायचे देखील. आणि इथे सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्यावर राजकारणाची पोळी भाजायची हे घृणास्पद आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून सोमवारी रात्री तुफान हिंसाचार झाला. यावेळी दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर परिसरात मोठे तणावाचे वातावरण होते. समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत तसेच हल्लात 33 पोलीस जखमी झाले आहेत. विधानभवनाबाहेर बोलताना उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावरून भाजप व सत्ताधाऱ्यांची सालटी काढली.
” छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेबाला व बलाढ्य सत्तेला नमवून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. महाराजांच्या निधनानंतर तो औरंगजेब स्वराज्यावर चालून आला होता. औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता पण महाराष्ट्राच्या मातीचा कणही जिंकू शकलेला नाही. महाराजांपासून प्रेरणा घेतलेल्या महाराष्ट्राने, छत्रपती संभाजी महाराज, रामराजे महाराज, राणी ताराराणी व असंख्य मावळ्यांनी त्याला मूठमाती दिली. थोडक्यात काय औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता पण तो इथल्या मातीचा कणही जिंकू शकला नाही. महाराष्ट्राने त्याला मूठमाती दिली. अशा औरंगजेबाचं समर्थन कुणी शिवप्रेमी करणार नाही. त्यामुळे जर कुणी त्याचं थडगं उकरण्याची भाषा करत असेल तर डबल इंजिन सरकार काय नुसतं वाफा सोडतंय का? मुख्यमंत्र्यांनी ही कबर उद्ध्वस्त करण्यास असमर्थता दाखवली आहे. त्याला केंद्रांचं संरक्षण आहे. केंद्र सरकार जर औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देत असेल तर तो औरंगजेब तुमचा कोण लागतो? औरंगजेब असो अफजलखान असो हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत. ते जर यांना वाटत असेल नष्ट करायचे तर तुम्ही आंदोलन काय करताय? मोदींकडे जा व सांगा गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब ज्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा व तो सोहळा कराल तेव्हा नितीश बाबू व चंद्राबाबूंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा.
गृहमंत्र्यांचं घर नागपूर आहे, संघाचे मुख्यालय नागपूरात आहे. अशा नागपूरात हिंदू खतरे में कसं, इतके वर्ष तुम्ही काय केलं. आणि जर हे पूर्वनियोजित होतं तर तुमचं गृहखातं झोपा काढत होतं का? हे तुमच्या कानावर का नाही आलं आणि आलं तर कारवाई का नाही केली? सरकार त्याचं अपयश लपवण्याचं प्रयत्न करतेय व अपयश लपवण्यात आणखी अपयशी ठरतेय. भाजपचं हिंदुत्वाचं ढोंग आम्ही पाहिलं आहे. तुम्हाला जर हिरव्या रंगावर राग असेल तर तुम्ही पहिला तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा. नंतर हिंदू मुस्लिम करा. एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान करायचं व दुसरीकडे पाकिस्तानसोबत मॅच खेळायची. ती मॅच दुबईला घ्यायची आणि मग यांची पोरंटारं ती मॅच जाऊन बघणार. अमित शहांचा मुलगा मॅच आयोजित करणार आणि इथं हिंदुस्थान पाकिस्तान करून सामान्यांच्या मुलांना लढवायचं. हे हिंदुत्व कोणतं. बांग्लादेशात हिंदूवर अत्याचार होतायत हे समोर आल्यानंतरही त्याच बांगलादेशसोबत क्रिकेटमॅच खेळायची. सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची त्यावर राजकारणाची पोळी भाजायची हे घृणास्पद आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले
Comments are closed.