‘ओला दुष्काळ’ शब्द फडणवीस यांचाच!उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर पत्रच वाचले

‘ओला दुष्काळ’ ही संज्ञाच सरकारी कारभारात नाही, असे सांगत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी धुडकावणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उघडे पाडले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनीच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारे पत्र दिले होते. ते पत्रच वाचून दाखवत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचा खोटेपणा समोर आणला.

उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून मला 16 ऑक्टोबर 2020 रोजी पत्र लिहिले होते, असे नमदू करत ते पत्र उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखवले. विविध वाहिन्यांवर शेतकऱयांचे दुःख पाहून वेदना होत आहेत, सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी फडणवीस यांनी त्या पत्रात केली होती. त्याचा उल्लेख करत ’आज तुम्हीच मुख्यमंत्री आहात, मग तेच निकष लावून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा’, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले. तेव्हा ओला दुष्काळ ही संज्ञा होती मग तुमचे सरकार आल्यावर ही संज्ञा काढली का? माणसाच्या पदानुसार शब्द बदलतो का? मुख्यमंत्री असताना आपल्याला वेदना झाल्या होत्या म्हणून त्यावेळी कोणाचीही वाट न पाहता शेतकऱयांची कर्जमाफी केली होती याचीही आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

शब्दांचे खेळ करू नका. ओला दुष्काळ शब्द नसला तरी जे सत्य आहे त्याला नाकारता येत नाही. ओला दुष्काळ अशी संज्ञा सरकारी कामकाजात नाही असे म्हणत असाल तर तो शब्दच काढून टाका, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ओला दुष्काळ म्हणा नाहीतर सरकारच्या अकलेचा दुष्काळ म्हणा, पण शेतकऱयांना मदत करा, भाजपने जाहिरातबाजीवर जेवढा पैसा खर्च केला, तेवढाच पैसा पूरग्रस्त शेतकऱयांच्या मदतीसाठी द्या, यावर उद्धव ठाकरे यांनी जोर दिला. शेतकऱयांना संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला.

एक फुल दोन हाफचा अजून अभ्यासच सुरू

देवेंद्र फडणवीस पूरग्रस्तांसाठी मदत आणायला दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. पंतप्रधानांनी प्रस्ताव पाठवायला सांगितला असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पंतप्रधान तिकडे प्रस्तावाची वाट बघताहेत. आणि एक फुल दोन हाफ यांचा अभ्यास आणि प्रस्ताव बनवणे सुरू आहे. अजूनही प्रस्ताव गेलेला नाही. फडणवीस अजूनही अभ्यास करत आहेत, प्रस्तावाचा अभ्यास सुरू आहे, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली.

खड्डय़ात गेलेल्या शेतकऱयाला सरकारने आणखी खड्डय़ात घातले

पूरबाधितांना मदत करण्यास सरकारने उसासाठी प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ऊस उत्पादक शेतकऱयांकडून प्रतिटन पाच रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन 10 रुपये याप्रमाणे 15 रुपये कपात केली जाणार आहे. अतिवृष्टी आणि पुराचा ऊस उत्पादक शेतकऱयांनाही फटका बसला आहे. तरीही ही कपात शेतकऱयांसाठी आहे, म्हणजे खड्डय़ात गेलेला शेतकरी त्याला आणखीन खड्डय़ात घातले तर त्याच्यात गैर काय अशी या सरकारची धारणा झालेली आहे, अशी चपराक उद्धव ठाकरे यांनी लगावली.

विमा कंपन्यांचे निकष अन्यायकारक

शेतकऱयांना पीक विम्याचे पैसे मिळण्यातही निकषांची अडचण येत आहे. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, विमा कंपन्यांनी लावलेले निकष पूर्णच होऊ शकत नाहीत. पिक विम्याचे पैसे कधीही शेतकऱ्यांना मिळू शकत नाहीत असे निकष लावण्यात आले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी नुकतीच राज्यभर पाहणी केली, शेतकऱयांना भेटलो. त्यांचे हाल ऐकले. सरकारला विनंती केली की राजकारण न करता मार्ग काढावा. पण सरकारची तशी तयारी नाही. मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री पाकिटांवर फोटो छापण्यात मग्न आहेत तर दुसरे उपमुख्यमंत्री कोणताही विषय आला की दिसतच नाहीत आणि जनता मात्र वाऱयावर आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले.

केंद्राचे पथक पाहणीसाठी कधी येणार?

देशात कुठेही दुष्काळ पडला की केंद्र सरकारचे पथक पाहणीसाठी जाते. आढावा घेतला जातो. महाराष्ट्रात अभूतपूर्व दुष्काळ पडला असतानाही पेंद्राचे पथक अजूनही राज्यात आले नाही, ते कुठे आहे? येणार की नाही? आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी? त्यांचे पंचनामे होणार कधी, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

लाडक्या बहिणींना सहा महिन्यांचे पैसे आत्ताच द्या

‘लाडकी बहीण’ योजनेचा मुद्दा यावेळी पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर, सरकारने निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीने दोन-तीन महिन्यांचे पैसे अगोदरच दिले होते, तसेच यावेळी पुढील सहा महिन्यांचे पैसे अगोदरच द्यावेत, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्या पैशांतून लाडक्या बहिणींच्या कुटुंबांना अशा स्थितीत आर्थिक मदत मिळेल, असे ते म्हणाले.

शेतकऱयांना फुकटात घरे बांधून द्या

नुसते कागदी घोडे नाचवू नका. थातूरमातूर पंचनामे करू नका. शेतकऱयांना काय हवे-नको ते प्रत्यक्ष जाऊन पहा. पुरामध्ये शेतकऱयांची घरे आणि संसार वाहून गेला आहे. पंतप्रधान आवास योजनेसारखी ग्रामीण योजना नव्याने आणा आणि शेतकऱयांना पक्क्या स्वरूपाची घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून फुकटात बांधून द्या, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. शाळासुद्धा ताबडतोब सुरू करा, नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या, शेतजमिनीबरोबर रस्तेसुद्धा वाहून गेलेले आहेत. अनेक गावांचा आणि वस्त्यांचा संपर्कच तुटलेला आहे. तिकडे रस्त्यांची कामे ताबडतोब सुरू करा, असेही ते म्हणाले.

अमित शहा फक्त ‘व्यवहारा’साठी महाराष्ट्रात येतात

भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 5 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱयावर येणार आहेत असे पत्रकारांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘अमित शहा येणार. त्यांचे काही व्यवहार करायचेत ते करणार, महापौर भाजपचाच व्हायला पाहिजे असे कार्यकर्त्यांना सांगणार आणि निघून जाणार. शेतकरी मेला तरी चालेल. मागेही ते लालबागचा राजाच्या दर्शनाला आले होते. पण त्यावेळी आपले मराठी बांधव, मराठा समाज आंदोलन करत होता त्यांना भेटले नाहीत. कार्यकर्त्यांना भेटून महापौर भाजपचाच होणार सांगून निघून गेले. त्यांना दुसरा उद्योग नाही. त्यांना खूप मोठमोठी कामे आहेत. क्रिकेटचे सामने खेळवायचे आहेत. जय शहा आणखी काय मागेल त्याचा हट्ट पुरवायचा आहे.’

– मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नुसते मुजरे मारायला दिल्लीत जातात. त्यापेक्षा महाराष्ट्राच्या हक्काच्या मागणीसाठी, महाराष्ट्र संकटात आहे त्या मागणीसाठी दिल्लीत जा.

– डोळे आहेत ना. डोळय़ांच्या खोबणीत काय बसलेय की नाही. शेतकरी रडतोय. आत्महत्या करतोय. पिके पाण्यात सडून गेली आहेत. थातूरमातूर पंचनामे करू नका. हेक्टरी 50 हजार द्या.

कर्जमाफीवरून फटकारले

कर्जाच्या बोजामुळे शेतकऱयांच्या रोज आत्महत्या होत आहेत. शेतकऱयांना कर्ज फेडण्यासाठी जमीन गहाण ठेवावी लागते, बैलजोडी विकावी लागते, कधीकधी तर पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवावे लागते, त्यांच्या कर्जाची हमी सरकार कधी घेतच नाही; पण साखरसम्राट भाजपमध्ये गेले की त्यांच्या शेकडो-हजारो कोटींच्या कर्जाची हमी सरकार घेते. मग शेतकऱयांनी भाजपमध्ये जावे अशीच अपेक्षा आहे का? राज्यातील सर्व शेतकरी भाजपात गेल्यानंतर कर्जमाफी करणार का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

– साखर सम्राट भाजपमध्ये गेले की त्यांच्या शेकडो-हजारो कोटींच्या कर्जाची हमी सरकार घेते. मग शेतकऱयांनी भाजपमध्ये जावे अशीच अपेक्षा आहे का? राज्यातील सर्व शेतकरी भाजपात गेल्यानंतर कर्जमाफी करणार का?

Comments are closed.