अंधभक्तांविरुद्ध देशभक्त जिंकले! भाजप विरुद्ध भारत संघर्ष सुरू, उद्धव ठाकरे गरजले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल विद्यार्थी आणि तरुणांचे कौतुक केले. आज अभिनंदन नाही, तर तमाम देशभक्तांना अभिवादन करतो. आज कोणतीही निवडणूक कुणी जिंकले नाही, पण अंधभक्तांविरुद्ध देशभक्त जिंकले. भाजप विरुद्ध भारत अशा संघर्षाची सुरुवात आता झाली आहे. ही ठिणगी आता जागती ठेवा आणि देश पुन्हा कुणालाही कमजोर करू देऊ नका, असे आवाहन करतानाच तरुणाईच्या या एकजुटीची नोंद हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी केली जाईल, असे प्रशंसोद्गारही उद्धव ठाकरे यांनी काढले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेना आणि मनसेवर टीका करणाऱ्यांचा खरपूस समाचार या वेळी उद्धव ठाकरे यांनी घेतला. निवडणुकांना अजून तीन वर्षे आहेत असे आम्हाला विचारत आहेत. अरे निवडणुका गेल्या खड्डय़ात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पाहिलेय की, मतांची चोरी करता येते, पण माणसे चोरता येत नाहीत, मने चोरता येत नाहीत. कारण देशभक्तांची मने आता पेटली आहेत, पिसाळलेली आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. एका झुरळाने हुकूमशहाला नमवले, हा खरा विष्णूचा अवतार आहे, असे ते म्हणाले.
आत्महत्याग्रस्त मुलांच्या कुटुंबीयांच्या वेदना विसरणार नाही
पंतप्रधान मोदींना त्यांच्या लाडक्या धर्मेंद्र प्रधानांना मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्यापेक्षाही जास्त यातना पेपरफुटीनंतर जीव देणाऱ्या मुलांच्या कुटुंबीयांना झाल्या. त्या यातना आम्ही विसरणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला.
भोंदू अंधभक्तांना सापडतील तिकडे हिंदुत्व शिकवा
आंदोलन यशस्वी झाल्यानंतर बिथरलेले अंधभक्त विद्यार्थ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून त्यांना धमक्या देत आहेत. विद्यार्थ्यांनीही भोंदूत्व स्वीकारलेल्या या अंधभक्तांचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट करावेत आणि जिथे सापडतील तिथे त्यांना हिंदुत्व व राष्ट्रभक्ती शिकवावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
खड्डा मंत्री… इथेनॉलवर बोलतात!
पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवरही उद्धव ठाकरे यांनी या वेळी शरसंधान केले. ते म्हणाले की, मोदीजी, तुमचे मंत्री त्यांचे काम सोडून पक्ष फोडण्यात बिझी आहेत. त्यांना सांगा आता देशाचे काम करा. अर्थमंत्री निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपरफुटीचे फायदे समजून सांगताहेत. देशाच्या संरक्षणाची बोंब आहे, पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी पुढे आले. खड्डा मंत्री… नव्हे रस्ता मंत्री, ते इथेनॉलवर बोलताहेत, असे म्हणत त्यांनी पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही लक्ष्य केले.
Comments are closed.