एक देश, एक तिरंगा, एक आवाज, शिवसेना भवनाच्या प्रांगणात भव्य ध्वजारोहण सोहळा; उद्धव ठाकरे यांची उपस्थिती
एक देश, एक तिरंगा, एक आवाज… अशी साद घालत शिवसेनेने देशाच्या स्वातंत्र्यदिनी भव्य ध्वजारोहण सोहळय़ाचे आयोजन केले आहे. शिवसेना भवनाच्या प्रांगणात 14 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
ब्रिटिशांच्या जोखडातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. घरादारांवर तुळशीपत्र ठेवून असंख्य देशभक्तांनी केलेल्या या बलिदानामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य चिरायु व्हावे यासाठी शिवसेना सदैव झटत आली आहे. शिवसेनेने देशाभिमान कायम जपला आहे. देशाविषयीच्या याच कृतज्ञभावनेतून स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तिरंगा झेंडा फडकावला जाणार आहे. या सोहळय़ाला शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, विभागप्रमुख, पदाधिकारी व शिवसैनिकांसह देशप्रेमी नागरिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते-खासदार अनिल
देसाई यांनी दिली.
चला, स्वातंत्र्याची मशाल पेटत ठेवूया!
स्वातंत्र्यदिनी होणाऱया ध्वजारोहण सोहळय़ाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ‘एक्स’वर खास पोस्ट केली आहे. ‘स्वातंत्र्य, संविधान आणि लोकशाहीच्या मूल्यांचा सन्मान करण्यासाठी चला आपण सर्वजण एकत्र येऊया… स्वातंत्र्याची मशाल पेटत ठेवूया,’ असे आवाहन तमाम जनतेला करण्यात आले आहे.
जेन-झी तरुणाईला उत्सुकता
शिवसेनेचा ध्वजारोहण सोहळा हे मुंबईकरांसाठी खास आकर्षण असते. तरुणाईच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोहळय़ातील वातावरण भारलेले असते. मागील वर्षीपर्यंत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी ध्वजारोहण होत असे. मात्र सोहळय़ाला होणारी गर्दी व वाहतूककाsंडीचा विचार करून हा सोहळा 14 ऑगस्टच्या मध्यरात्री घेतला जाणार आहे. या सोहळय़ाची जय्यत तयारी करण्यात आली असून या सोहळय़ाविषयी जेन-झी तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
Comments are closed.