महापालिकेला डोळ्यात तेल घालून मतदार याद्या तपासा, घुसखोरांना शोधा; उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने लाखो मते चोरली. ते पुराव्यासह उघड झाल्यानंतर शिवसेनेसह सर्वच पक्ष सतर्क झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आगामी निवडणुकीत अशी मतचोरी होऊ नये म्हणून शिवसैनिकांना अत्यंत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. आगामी महानगरपालिका निवडणुकीत डोळय़ात तेल घालून मतदार याद्या तपासा, घुसखोरांचा शोध घ्या, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

उद्धव ठाकरे यांनी आज दहिसर येथील शिवसेना शाखा क्र. 4 येथे भेट दिली. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीचे कौतुक करत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. ही केवळ शाखा भेट नसून कौटुंबिक भेट आहे, असे ते म्हणाले. अनेक वेळा शाखाप्रमुख व अन्य पदाधिकारी ‘मातोश्री’वर भेटायला येत असतात, पण शिवसेनेच्या कुटुंबातील सर्वांना भेटायचे असेल तर मला माझ्या या घरी यावे लागते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यापूर्वीही आपण शाखांना भेटी दिल्या होत्या आणि यापुढेही देत राहू, असे ते म्हणाले.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा, अशा सूचना त्यांनी प्रत्येक गटप्रमुख आणि शिवसैनिकाला दिल्या. सण–उत्सव असले तरी आजपासूनच मतदार याद्यांची तपासणी सुरू करा. घरोघरी जाऊन छाननी करा. एका माणसाला एकच मत आहे का ते बघा. नाहीतर निवडणुकीच्या दिवशी जे मतदार आपल्यातले नाहीत, त्यांच्या नावाने बोगस मतदान होईल. काही ठिकाणी दुबार, तिबार मतदान होते. गेल्या निवडणुकीत 42 लाख मतदार महाराष्ट्रात वाढवले गेले, ते घुसखोर कोण आहेत त्यांचा शोध घ्या आणि त्यांना मतदान करू देऊ नका, असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी दिले. सध्या पाऊस पडतोय, पण येत्या निवडणुकीत शिवसेनेवर मतांचा पाऊस कसा पडेल ते बघा, असे ते पुढे म्हणाले. याप्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत, उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक शुभदा शिंदे, युवासेना सहसचिव डॉ. सिद्धेश पाटेकर, शाखाप्रमुख पी. डी. चव्हाण, शाखा संघटक प्रणिता सावंत-नाईक आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

धक्का देणाऱ्यांची डोकी फुटतील, शिवसेना फुटणार नाही

शिवसेनेतून कुणीही दुसऱया पक्षात गेला की शिवसेनेला धक्का बसला अशा बातम्या प्रसारमाध्यमांतून येतात. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेला इकडे धक्का, तिकडे धक्का असे गेली दोन-तीन वर्षे सतत प्रसारमाध्यमांतून येतेय, पण असे धक्के देणारे अनेक आले आणि गेले. कदाचित थोडा धक्का बसला असेल, पण कधी धोका झालेला नाही. अनेकांनी धोके देण्याचे प्रयत्न केले आणि यापुढेही करतील, पण शिवसैनिकांची तटबंदी मजबूत आहे तोपर्यंत धोका आणि धक्के देणाऱयांची डोकी फुटतील, शिवसेना फुटणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

गणराया, काळ्या अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त कर

गणेशोत्सवाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी यावेळी गद्दार मिंध्यांना सणसणीत टोला लगावला. ते म्हणाले की, येत्या आठवडय़ात विघ्नहर्त्याचे आगमन होत आहे. मी गणरायाला आवाहन करतो की, तुझ्या कार्याचा, हिंदुत्वाचा पवित्र भगवा घेऊन शिवसेना पुढे निघाली आहे. स्वतःला वाघ म्हणवणारी अनेक काळी मांजरे वाटेत आडवी येत आहेत. त्या अपशकुनी काळ्या मांजरांचा बंदोबस्त तू कर. नाहीतर त्यांचा बंदोबस्त करायला तुझे शिवसैनिक आहेतच. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी विभाग क्र. 1 मधील दहिसर येथील शिवसेना शाखा क्र. 4 ला सदिच्छा भेट दिली. यावेळी शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळली होती. यावेळी शाखेतील हजेरीकहीत नोंद करून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.

चारकोपच्या शाखा क्रमांक 18 च्या वतीने उपविभागप्रमुख पांडुरंग देसाई यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवानिमित्त आरती संग्रहाचे वितरण करण्यात येणार आहे. या आरती संग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, शुभदा शिंदे, सुजाता शिंगाडे, संजय भोसले, अश्विनी सावंत, शाखाप्रमुख सिद्धेश जेधे, अनिता कुपेकर, चंद्रकांत सावंत, आरती संग्रहाचे प्रकाशक आकाश सोनावणे, मंगेश सोने, अनंत गवई उपस्थित होते.

आता गणेशोत्सव आहे, नंतर पितृपक्ष येईल. पितृपक्ष मी माझाच मानतो. कारण माझा पक्ष हा पितृपक्ष आहे. माझ्या पित्याने शिवसेनेची स्थापना केली. ज्यांना काही आगापिछा नाही, त्यांना सगळ्या चोऱ्या कराव्या लागतात.

Comments are closed.