महासागर उसळला… अफाट, अभूतपूर्व आणि अविस्मरणीय!
मराठी माणसाच्या एकजुटीसाठी ठाकरे बंधू साद घालतात काय… त्यांच्या एका हाकेवर वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे लोक जमतात काय… वाजतगाजत विजयी जल्लोष करतात काय आणि या जनसागराच्या साक्षीने ठाकरे बंधू महाराष्ट्रद्रोह्यांना ‘आवाज’ देतात काय… सगळेच अफाट, अभूतपूर्व आणि अफलातून! वर्णन करण्यासाठी शब्दही कमी पडावेत असा भव्यदिव्य आणि ऐतिहासिक असा हा विजयोत्सवी मेळावा होता. वरळीच्या डोम सभागृहात झालेल्या या मेळाव्यात मराठी माणसाच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले होते. या उधाणापुढे समुद्रही थिटा पडला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मनात पेटवलेला अंगार अजूनही तितकाच ज्वलंत आणि धगधगता असल्याची प्रचीतीच जणू आज आली.
‘हिंदीसक्ती’च्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एल्गार पुकारला व ती लढाई जिंकली, तेव्हापासूनच महाराष्ट्रातील वातावरण पालटू लागले होते. हे वातावरण नेमके किती पालटले आहे याचा प्रत्यय आज संपूर्ण देशाला आला. मराठी एकजुटीच्या विजयी मेळाव्यासाठी येणाऱ्या मराठीप्रेमींच्या गर्दीने मुंबईचे रस्ते आज नुसते ओसंडून वाहत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयजयकार करत लोकांचे जथेच्या जथे मिळेल त्या वाहनाने वरळीच्या दिशेने सरकत होते.
वरळीतील डोम सभागृहाच्या प्रवेशद्वारांवर गर्दीच्या लाटाच्या लाटा धडकत होत्या. जणू या लाटा बाजूच्या समुद्रातील लाटांशीच स्पर्धा करीत होत्या. कार्यक्रमाची वेळ झाल्यानंतही गर्दीचा ओघ थांबत नव्हता. मेळाव्यासाठी पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त होता.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
हजारोंच्या संख्येने मराठी जनता वरळीत विजयोत्सवासाठी येणार असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पार्किंगची समस्या होऊ नये याकरिता पार्किंगची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. शिवाय कोणालाही वाहतुकीचा अडथळा येऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनीदेखील योग्य नियोजन केले होते. मात्र तरीही हजारोंच्या संख्येने मराठी जनता एकवटल्याने पोलिसांना नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागल्याचे चित्र होते.
सभागृहाबाहेरही तुडुंब गर्दी
वरळीच्या डोम सभागृहातील आसने फुल्ल झाल्यानंतर लोक सभागृहातील मोकळ्या रांगेत उभे राहिले. मुंगी शिरायलाही जागा नव्हती. अखेर साडेअकराच्या सुमारास सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यानंतरही बाहेर हजारोंची गर्दी झाली होती.
घोषणांनी वरळी दुमदुमली!
‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘मुंबई आमच्या हक्काची…नाही कुणाच्या बापाची’, ‘मराठी माणूस भडकला… भगवा झेंडा फडकला’, ‘उद्धव-राजसाहेब आगे बढो… हम तुम्हारे साथ है’ अशा जोरदार घोषणांनी वरळी परिसर दणाणून गेला.
नाक्यानाक्यांवर मेळाव्याचीच चर्चा
बेस्टच्या बसगाड्या आणि रेल्वे गाड्यांमध्ये आणि नाक्यानाक्यांवर आज फक्त मेळाव्याचीच चर्चा होती. शिवसेना व मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भेटल्यावर ’जय महाराष्ट्र’ करत होते, एकमेकांची विचारपूस करत होते. त्यामुळे ’जय महाराष्ट्र’चा गजरच आज मुंबईत घुमला. इतकी गर्दी असूनही कुठेही गडबड, गोंधळ दिसला नाही. व्यवस्थेत असलेले पदाधिकारी, पोलीस यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन केले जात होते.
लक्षवेधी बॅनर
विजयी मेळाव्याचे बॅनर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात लागले होते. या बॅनरवरील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकत्रित फोटो लक्ष वेधत होते.
Comments are closed.