38 जणांची हत्या करून मानवी मांस खाणारा नरभक्षक युगांडामध्ये जेरबंद; भरचौकात देणार फाशी!
गेल्या 15 वर्षांत तब्बल 38 जणांची अत्यंत निर्घृण हत्या करून त्यांचे मांस खाणाऱ्या एका भयानक सिरियल किलर आणि नरभक्षकाला (Cannibal) युगांडाच्या सुरक्षा दलाने बेड्या ठोकल्या आहेत. मुजुरिझी मोझेस (Mujurizi Moses) असे या नराधम आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेची माहिती युगांडाच्या सैन्याचे प्रमुख जनरल मुहूझी कायनेरुगाबा यांनी ‘एक्स’ वर दिली आहे. आरोपीवर जाहीर खटला चालवून त्याला थेट फाशीची शिक्षा दिली जाईल, असा सज्जड इशारा सैन्यप्रमुखांनी दिला आहे.
सैन्यप्रमुख जनरल कायनेरुगाबा यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मुजुरिझी मोझेस याने 2010 ते 2025 या कालावधीत मसाका, इबांडा आणि काझो या जिल्ह्यांमध्ये ही मालिका हत्यारे घडवून आणली आहेत. युगांडाच्या इतिहासातील तो सर्वात क्रूर सिरियल किलर आणि नरभक्षक असल्याचे मानले जात आहे. सुरक्षा दलाने अखेर त्याला जेरबंद केले असून, त्याच्यावर जाहीर खटला चालवून नक्कीच मृत्युदंड दिला जाईल, असे जनरल कायनेरुगाबा यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक तपास यंत्रणांनी उघड केलेल्या माहितीनुसार, हा आरोपी प्रामुख्याने संपूर्ण कुटुंबांना आपले लक्ष्य करत असे. रात्रीच्या अंधारात लोकांच्या घरांची भिंत किंवा छत फोडून आत शिरायचे आणि कोयत्याने घरातील सर्व सदस्यांची निर्घृण कत्तल करायची, असा त्याच्या गुन्ह्याचा भयानक पॅटर्न होता. अशाच एका थरारक प्रकरणात त्याने पास्टर स्टीव्हन मुगांबे यांच्या घरात भगदाड पाडून घरातील सर्वांची हत्या केली होती. याशिवाय काही प्रकरणांमध्ये तो पीडितांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची हत्या करत असल्याचेही तपासात समोर आले आहे.
विशेष म्हणजे, या नराधमाला यापूर्वीही पोलिसांनी एकदा जेरबंद केले होते. मात्र संशयास्पद परिस्थितीत तो पोलिसांच्या कोठडीतून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. ताज्या अटकेनंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या घरातून अनेक महत्त्वपूर्ण पुरावे हस्तगत केले आहेत. या कारवाईनंतर परिसरातील बेपत्ता व्यक्ती आणि जुन्या प्रलंबित खुनांच्या प्रकरणांच्या फाईल्स पुन्हा उघडण्यात आल्या असून, पोलीस या गुन्ह्यांचे जाळे उलगडत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया आता वेगाने सुरू करण्यात आली आहे.
Comments are closed.