टोरेस घोटाळ्यामागे युक्रेनचे माफिया; पोलीस संरक्षण मागत, आरोपी सीएची कोर्टात याचिका
अल्पावधीतच जास्त पैशांचा नफा देण्याचे आमिष दाखवत टोरेस कंपनीने लाखो नागरिकांना कोटय़वधी रुपयांना ठकवल्यानंतर या फसवणूक प्रकरणातील आरोपी सीए अभिषेक गुप्ता याने हायकोर्टात धाव घेतली आहे. टोरेस घोटाळय़ामागे युक्रेनमधील माफियांचा हात असून या घोटाळय़ाशी आपला संबंध नसल्याचा दावा गुप्ताने याचिकेत केला असून आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. हायकोर्टाने याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेला प्रतिवादी करण्याचे निर्देश देत प्रकरणाची सुनावणी सोमवार, 13 जानेवारी रोजी ठेवली आहे.
टोरेस घोटाळय़ात आरोपी करण्यात आलेल्या सीए अभिषेक गुप्ता हे निर्दोष आहेत. त्यांना धमक्या येत असून कंपनीच्या संचालकांकडून त्याचा छळ केला जात आहे असा दावा करत गुप्ता याने मुंबई उच्च न्यायालयात पोलीस संरक्षणाच्या मागणीसाठी ऍड. प्रियांशू मिश्रा, ऍड. विवेक तिवारी यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज शुक्रवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, त्यांची ओळख कंपनीच्या संचालकामार्फत झाली होती. ऑडिट करताना कंपनीत मोठा घोटाळा असल्याचे त्यांना समजले. या फसवणुकीची माहिती त्यांनी संचालकांना दिली. तेव्हा त्यांना लोअर परळच्या कार्यालयात बोलावण्यात आले व युक्रेनियन नागरिकांनी धमकावले. इतकेच नव्हे तर पाच कोटींची लाच देऊ करत या गोष्टीची चर्चा केल्यास त्यांना जीवे मारण्यात येईल असे बजावण्यात आले. याची तक्रार गुप्ता यांनी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात केली, मात्र ती स्वीकारण्यात आली नाही. न्यायालयाने या युक्तिवादाची दखल घेत पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला प्रतिवादी करण्यास सांगत नोटीस बजावली व सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली.
सरकारचे म्हणणे काय
सरकारच्या वतीने अॅड. प्राजक्ता शिंदे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी खंडपीठाला माहिती देताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त (संरक्षण व सुरक्षा) हे याचिकाकर्त्याला खरच धमकी मिळाली होती का त्या दृष्टीने तपास करत असून त्याबाबतच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. याचिकाकर्त्याला पुन्हा धमकी मिळाल्यास संरक्षण देण्याबाबत विचार केला जाईल.
घोटाळा प्रकरणातील साक्षीदार
आपल्या अशिलाविरोधात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असून त्यांचा याचाशी काहीही संबंध नाही. याउलट सीए अभिषेक गुप्ता हे या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहेत. त्यांनी टोरेस कंपनीचा घोटाळा आधीच बाहेर काढला आहे. त्यांनी ऑक्टोबर महिन्यातच गैरव्यवहार होत असल्याची माहिती दिली होती, असा दावा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला.
तानियाच्या घरात 77 लाख
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारपासून चार ठिकाणी झाडाझडती घेण्यास सुरूवात केली. आज ही झाडाझडती संपली. या कारवाईत पोलिसांनी एकूण 5 कोटींची रोकड हस्तगत केली आहे. त्यापैकी 77 लाख रुपये तानिया ही भाडय़ाने राहत होती त्या कुलाबा येथील घरात सापडले. तर उर्वरित रक्कम दादर येथील कार्यालयात सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
एसीपींकडून चौकशी
सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी टोरेसकडे नेमकी काय विचारणा केली होती. तेव्हा काय माहिती टोरेसकडून घेण्यात आली, शिवाय टोरेसविरोधात कोणी तक्रार दिली होती का? दिली होती तर त्याचे पुढे काय झाले, याची सहाय्यक आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे.
लॅपटॉप, हार्ड डिस्क, मोबाईल आदी इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स तसेच गुंतवणुकी संबंधातिल दस्तावेज, नागरिकांना दाखविण्यात येणारे हजारो खडे, त्या खडय़ांची माहिती देणारे प्रमाणपत्र आदी मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
विरारचा तौफिक आधार कार्ड बनवून द्यायचा
टोरेसचा आर्थिक झोल समोर आला असला तरी या आर्थिक फसवणुकीच्या कटात सहभागी असलेला तौफिक रियाझ हा मात्र पसार होण्यात यशस्वी ठरला. विरारचा रहिवासी असलेला तौफिक भायखळा, नागपाडा परिसरात आधार कार्ड बनवून द्यायचे काम करत होता. अटकेत असलेला सर्वेश हादेखील आधार कार्ड बनवून द्यायचे काम करायचा. प्लॅटिनम हर्न प्रा. लि कंपनीत परदेशी भामटय़ांसोबत सहभागी झाल्यानंतर त्यांना संचालक, सीईओ अशी पदं देण्यात आली होती.
चौकशीत सहकार्य नाही
अटक केलेले आरोपी पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नसून दिशाभूल करणारे वक्तव्य करत असल्याचे समजते. पण लवकरच सर्व बाबींची स्पष्टता होईल असे पोलिसांकडून सांगण्यात येते.
कंपनीच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर भंडाफोड टोरेसच्या दादर येथील कार्यालयात 5 जानेवारीला कंपनीच्या पदाधिकाऱयांमध्ये वादविवाद झाले. त्यादिवशी तेथे मेल वॉर रंगले होते. खोटी स्किम चालवता, खोटे खडे वाटेल त्या किमतीला विकता, लोकांना फसवताय, आमचे पैसे देत नाही अशा विविध कारणांवरून त्या दिवशी वाद रंगले होते. अखेर संतापलेल्या काही जणांनी त्यांच्या संपर्कात असलेल्या गुंतवणूकदारांना संपर्क साधून बोलावून घेतले. त्यानंतर त्या कर्मचाऱयांसह गुंतवणूकदारांनी टोरेसचे कार्यालय गाठले होते. एकाचवेळी मोठया संख्येने लोकं जमा झाल्याचे कळताच शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर भाजी विक्रेता प्रदीपकुमार वैश्य यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी टोरेसविरोधात गुन्हा नोंदवला. ही बाब वाऱयासारखी पसरल्यानंतर गुंतवणूकदारांनी टोरेसचे कार्यालय गाठण्यास सुरुवात केली होती, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.
250, 300 रुपयांचे खडे 45, 50 हजारांत विकले
टोरेस ज्वेलरीच्या नावाने आरोपी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी मोजोनाईट खडे, चांदीच्या रिंग दाखवायचे आणि ते खरेदी करण्यास सांगून सदरची रक्कम गुंतविण्यास सांगितले जायचे. गुंतवणूकदारांनी देखील ते खडे खरे असल्याचे गृहीत धरून त्यात पैसे गुंतवले. पण वास्तविक ते बनावट खडे असून त्याची किंमत 250 ते 300 रुपये आहे. स्थानिक बाजारातून ते खडे खरेदी करून आरोपींनी ते 40, 45, 50 हजार अशा किमतीत विकले. खऱयाच्या नावाने बनावट खडे विकण्याचे काम आरोपींनी केले तर नागरिकांना आमिषाला बळी पडत ते खरेदी केले. शिवाय चांदीची रिंग सांगून स्टीलची रिंग दिली जित होती.
ख्रिसमसचा मोका साधून व्हिक्टोरिया आणि ओलेना भारतातून सटकल्या
गुंतवणूक करा आणि आठवडय़ाला चांगला परतावा मिळवा अशी स्किम आणून लोकांना फसवले गेले. त्यात प्रमुख आरोपी असलेल्या युक्रेनच्या नागरिक व्हिक्टोरिया कासातोव्हा आणि ओलेना स्टोयन या दोघी ख्रिसमसचा मोका साधून डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात भारतातून सटकल्या.
Comments are closed.