नामफलक बंद, साफसफाई, अग्निशमन यंत्रणेचीही बोंब; उल्हासनगर परिवहन सेवेच्या कंत्राटदाराची पोलखोल, अतिरिक्त आयुक्तांनी बजावली नोटीस

दहा वर्षांपासून ठप्प पडलेली उल्हासनगर पालिकेची परिवहन सेवा पुन्हा एकदा धावू लागली आहे. मात्र कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभाराची काही महिन्यातच पोलखोल झाली आहे. परिवहनच्या बसेस साफसफाई न करताच चालवल्या जात असून अनेक गाड्या नामफलकाविनाच चालविल्या जात आहेत. तसेच अग्निशमन यंत्रणादेखील बंद आहेत. अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनी आज स्वतः काही बसेसमधून प्रवास करत झाडाझडती केली. त्यावेळी हा सर्व प्रकार समोर येताच त्यांनी ऑन दि स्पॉट कंत्राटदाराला नोटीस बजावत दंडही आकारला आहे.

परिवहन सेवेच्या 10 नॉन एसी बसेस उल्हासनगरात आणि 10 एसी बसेस या बदलापूर व टिटवाळा मार्गावर धावत आहेत. बसेसची सेवा अनुभवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनी शहरातील नॉन एसी बसमधून प्रवास केला. तेव्हा त्यांनी प्रवासादरम्यान बसमधील काही नागरिकांशी संवाद साधून बससंदर्भात काय समस्या आहेत याचा आढावा घेतला. त्यावेळी बसमध्ये साफसफाई नसल्याचे निदर्शनास आले. तसेच बसमध्ये नामफलक बंद असल्याचे लक्षात आले. याबरोबरच बसमधील अग्निशमन यंत्रही जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. बसमधील या सर्व त्रुटी अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनी पाहून संबंधित विभागाला या त्रुटींची पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून नोटीस देण्यास सांगितले आहे.

2014 मध्ये गुंडाळला होता गाशा
महानगरपालिकेची परिवहन सेवा 2009 साली सुरू झाली होती. सेवा हाताळण्याचा ठेका केस्ट्रल कंपनीचे राजा गेमनानी यांना मिळाला होता. मात्र रस्त्यांची खराब अवस्था आणि त्यामुळे बसमध्ये होणारा वारंवार बिघाड लक्षात घेऊन भाडेवाढ करून मिळावी अशी मागणी महानगरपालिकेकडे केली होती, पण त्यास प्रतिसाद न मिळाल्याने गेमनानी यांनी 2014 मध्ये परिवहन सेवेचा गाशा गुंडाळला होता. तेव्हापासून ठप्प पडलेली बससेवा तत्कालीन आयुक्त अजीज शेख यांच्या कालावधीत 2024 साली सुरू झाली आहे.

Comments are closed.