उल्हासनगर पालिकेने बचत गटाच्या ‘लाडक्या बहिणींना’ फसवले, मंजूर केलेले 50 स्टॉल्स रद्द; अधिकाऱ्यांना धारेवर धरले

उल्हासनगर पालिकेने शेकडो लाडक्या बहिणींना फसवले आहे. बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने ५० स्टॉल्स मंजूर केले होते. त्यामुळे बेरोजगार महिलांच्या हाताला काम मिळणार होते. मात्र तडकाफडकी हे स्टॉल्स रद्द केल्याने महिला सक्षमीकरण मोहिमेचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज पालिकेवर धडक देत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
बचत गटाच्या माध्यमातून छोटे-मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह केला जातो. उल्हासनगर पालिकेने शहरातील बचत गटाच्या महिलांना हक्काची जागा उपलब्ध करून देण्यासाठी ५० स्टॉल्स मंजूर करून दिले होते. महिलांचे सक्षमीकरण करण्यात येत असल्याचा गवगवा करून लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या ५० महिलांना मार्च-एप्रिल महिन्यात प्रशिक्षणही देण्यात आले होते. मात्र आठ महिन्यांनंतरही स्टॉलचे वितरण अद्याप झालेले नसतानाच अचानक महापालिकेकडून सदर प्रक्रिया रद्द केल्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे बचत गटाच्या महिलांना धक्का बसला.
…तर मंगळवारी मोर्चा काढू
पालिकेचा हा भोंगळ प्रकार समजताच अशोका फाऊंडेशन या सामाजिक संघटनेचे शिवाजी रगडे यांच्या नेतृत्वाखाली उषा वाघ, मनीषा झेंडे, आम्रपाली बनकर, रुपाली बारबदे, भावना झवेरी, रुपाली पाटील, प्रतिभा कटारे, दीपिका नांदगावकर, शुभांगी चव्हाण तसेच महिलांनी बालकल्याण विभागाचे प्रमुख गणेश पवार यांना निवेदन देऊन जाब विचारला. सोमवारपर्यंत महिलांना न्याय देण्यात आला नाही तर मंगळवारी बचत गटाच्या महिलांचा महानगरपालिकेवर मोर्चा काढू असा इशारा दिला.

Comments are closed.