दिग्गज पंच डिकी बर्ड यांचे निधन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय पंच हॅरॉल्ड ‘डिकी’ बर्ड यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. इंग्लंडच्या यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबने ही दुःखद बातमी जाहीर केली. बर्ड यांनी आपल्या राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतल्याची माहिती क्लबने आपल्या निवेदनात दिली.
लोकप्रियता आणि स्वभाव
डिकी बर्ड यांची पंचगिरी फक्त काटेकोर निर्णयांपुरती मर्यादित नव्हती. त्यांचा विनोदी, थोडासा विचित्र पण हृदयस्पर्शी स्वभाव प्रेक्षक आणि खेळाडूंना आपलासा वाटायचा. म्हणूनच ते फक्त इंग्लंडमध्ये नव्हे, तर हिंदुस्थानसह जगभरात चाहत्यांच्या हृदयात घर करून राहिले.
यॉर्कशायर क्लबने त्यांना ‘राष्ट्रीय खजिना’ म्हटले होते आणि त्यांच्या ‘निर्णयाच्या नेमकेपणासोबतच उबदार स्वभावासाठी’ गौरव केला होता.
खेळाडू म्हणून सुरुवात
पंच होण्यापूर्वी डिकी बर्ड हे यॉर्कशायर आणि लेस्टरशायरकडून प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळले. मात्र दुखापतीमुळे त्यांची खेळाडू कारकीर्द 32व्या वर्षीच थांबली.
1970 मध्ये पहिल्यांदा काउंटी सामन्यात पंचगिरी केली आणि 1975 मध्ये पुरुषांच्या पहिल्याच वर्ल्ड कप फायनलमध्ये पंचगिरी करण्याचा मान लाभला होता. बर्ड यांच्या आत्मचरित्राच्या तब्बल दहा लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या होत्या.
पंचगिरीची कारकीर्द
1973 मध्ये त्यांनी आपली पंचगिरी कारकीर्द सुरू केली. पुढील दोन दशके त्यांनी कसोटी, एकदिवसीय सामने आणि वर्ल्ड कप सामन्यांत आपली छाप पाडली. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 66 कसोटी, 69 एकदिवसीय सामने आणि 3 वर्ल्ड कप फायनल्समध्ये पंचगिरी केली.
1996 मध्ये त्यांनी आपल्या पंचगिरीतून निवृत्ती घेतली होती. त्यांना त्यांच्या अखेरच्या कसोटी सामन्यात लॉर्ड्सवर इंग्लंड आणि हिंदुस्थानच्या खेळाडूंनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ देत निरोप दिला होता.
Comments are closed.