IND vs SA: गिलचा सहभाग दुसऱ्या कसोटीसाठी अनिश्चित? पर्यायी खेळाडू सज्ज, पण हा मोठा प्रश्न कायम

भारतीय कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी टीमसोबत गुवाहाटीला पोहोचला आहे. मात्र त्याची मानदुखी पूर्णपणे बरी झालेली नाही. गिल गुरुवार आणि शुक्रवारच्या सरावात स्वतःला फिट असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करेल. टीमच्या सूत्रांनुसार गिल अजून 100% फिट नाही, मानेला अजूनही थोडासा त्रास आहे.

बीसीसीआयनेही सांगितले की, गिलवर उपचारामुळे सुधारणा झाली आहे आणि त्याच्या खेळण्याबाबतचा निर्णय मेडिकल टीम त्याच्या प्रगतीनुसार घेईल. त्यामुळे गिल दुसऱ्या कसोटीमध्ये खेळणार का यावर संशय कायम आहे.

पहिल्या कसोटीदरम्यान गिलच्या मानेला आकड आल्याने तो रिटायर्ड हर्ट झाला होता आणि पुढे फलंदाजी करू शकले नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत भारताला सामना 30 धावांनी गमवावा लागला.

गिल फिट नसल्यास, करुण नायरसारखा फॉर्मात असलेला उजव्या हाताचा फलंदाज का घेतला जात नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्पिन खेळण्यात त्याचा अनुभव टीमसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

साई सुदर्शन आणि पडिक्कल हे दोघेही डावखुरे आहेत, त्यामुळे स्पिनसमोर उजव्या हाताच्या फलंदाजाची गरज अधिक आहे. सरफराज, करुण नायर, अभिमन्यु ईश्वरन यांच्यावर सध्याचे प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांचा पूर्ण विश्वास नाही.

भारतीय फलंदाजांची स्पिनसमोरची कमजोरी लक्षात घेता, टीमला गिलसारख्या अनुभवी खेळाडूची गरज आहे. कर्णधार म्हणूनही गिल एका महत्त्वाच्या कसोटीमधून बाहेर बसू इच्छित नाही.

गिल खेळू शकला नाही, तर नितीश रेड्डी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकतो. त्याला भारत ए मधून परत बोलावून टीममध्ये सामील करण्यात आले आहे.

Comments are closed.