U19 CWC: गोलंदाजीत भारताचा कहर! वैभव सुर्यवंशीलाही विकेट, अमेरिका 107 वर ऑलआऊट
मुलांच्या 19 वर्षाखालील वनडे विश्वचषकाला गुरूवारपासून (15 जानेवारी) सुरूवात झाली आहे. भारत या स्पर्धेत आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न मैदानात घेऊन उतरलेल्या भारताचा पहिला सामना अमेरिका विरुद्ध आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत अमेरिकेला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यामुळे चाहत्यांना वैभव सुर्यवंशीची फलंदाजी पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. तत्पूर्वी भारताच्या गोलंदाजांनी अमेरिकेला सळो की पळो करून सोडले आहे.
सामन्याच्या सुरूवातीलाच अमेरिकेची फलंदाजी अडखळताना दिसली. त्यांनी पहिल्या 7 विकेट्स अवघ्या 31 षटकात 83 धावसंख्या करत गमावल्या. सध्यातरी भारताकडून सर्वाधिक विकेट्स हेनिल पटेलने घेतल्या आहेत. त्याने 7 षटकात 16 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्याने सलामीवीर अमरिंदर गिल, विकेटकीपर अर्जुन महेश आणि कर्णधार उत्कर्ष श्रीवास्तव यांना बाद केले. त्याला बाकी गोलंदाज दीपेश देवेंद्रन, आरएस अंबरिश, खिलान पटेल आणि कनिष्क चौहान हे देखील उत्तम साथ देत आहे. यांनीही प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.
वैभवनेही फलंदाजीत हात आजमावण्याआधी गोलंदाजी केली. त्याने त्याच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर विकेट काढली. त्याने नीतिश सुदीनी याला बाद केले. सुदीनीने अमेरिकेकडून सर्वाधिक अशा 52 चेंडूत 36 धावा केल्या.
अमेरिका शतकी धावसंख्या करण्याच्या प्रयत्नात असताना भारताची गोलंदाजी त्यांच्यासाठी अडसर ठरत आहे. अमेरिकेने 35.2 षटकात सर्व विकेट्स गमावत 107 धावसंख्या उभारली आहे. भारतासाठी ही धावसंख्या माफक असली तरी सर्वाच्या नजरा नेहमीप्रमाणे वैभववर असणार आहे.
पावसामुळे खेळ थांबला असून भारताची फलंदाजी पाहण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल.
Comments are closed.