परभणीत मशाल तळपली! शिवसेनेला 24 जागा, काँग्रेसचा 12 जागांवर विजय; मिंधे गटाचा भोपळाही फुटला नाही

भाजपने पैशांच्या अमाप राशी ओतूनही निष्ठावंत परभणीकरांनी शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवला. खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथे शिवसेनेने 65 पैकी 24 जागांवर दणदणीत विजय मिळवला. शिवसेनेसोबतच काँग्रेसनेही 12 जागांवर विजय मिळवल्याने परभणी महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. मिंधे गटाचा भोपळाही फुटला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नगरसेवक निवडून आले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जंग जंग पछाडून भाजपला केवळ 12 जागांवर विजय मिळाला.

परभणी महापालिकेच्या 16 प्रभागांतील 65 जागांसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची आज मतमोजणी करण्यात आली. शिवसेना पक्षाच्या उमेदवारांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. शिवसेनेचे व्यंकट डहाळे, मोहंमद सुफियान, शेख हुसेना बानो, डॉ. मोहंमद बरकतुल्ला, रईस खान, मिलिंद घागरमाळे, नौशिन फातेमा, सायरा बेगम, सय्यद शरपद्दीन, प्रतिभा सरोदे, सबाह आफरिन, अब्दुल साजिद, दिलीपसिंग ठाकूर, शुभांगी पाष्टे, राजेश रणखांबे, वाहेदा तांबोळी, विकास राजापुरे, अर्जुन गुज्जर, अबोली कांबळे, सुलोचना भालेराव, श्याम खोबे, उषा अवचार, शेख रईस आदी उमेदवार मोठय़ा फरकाने विजयी झाले.

शिवसेनेच्या यशाचे शिल्पकार

खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी परभणी महापालिकेसाठी कुशल नियोजन केले होते. प्रभागनिहाय उमेदवारांची निवड करण्यापासून ते प्रचारापर्यंतची सर्व आघाडी या दोघांनी सांभाळली. मतदान पेंद्रावरील बूथ नियोजनही अतिशय उत्तम पद्धतीने करण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला.

g परभणी महापालिकेत मिंध्यांनीही चांगलेच हातपाय मारले होते, परंतु त्यांचा भोपळाही फुटला नाही.

भाजपचा गर्व मतदारांनी उतरवला

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सुरुवातीपासून भाजपला बहुमत मिळणार असल्याची हवा तयार केली होती. महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने अक्षरशः पैशाचा महापूर आणला. ऐनवेळी इतर पक्षातले उमेदवार आयात करण्यात आले. निष्ठावंतांना डावलण्यात आले. एवढा सगळा आटापिटा करून भाजपची घोडदौड फक्त 12 जागांवरच थांबली.

Comments are closed.