लव्ह अँड वॉर चित्रपटाच्या सेटवर दुर्दैवी अपघात; विजेचा धक्का लागून तंत्रज्ञाचा मृत्यू, कुटुंबाला मिळणार इतक्या लाखांची मदत
मुंबईत फिल्म सिटीमध्ये सुरू असलेल्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाच्या सेटवर झालेल्या दुर्दैवी अपघातात एका तंत्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भन्साळी प्रॉडक्शन्सने मृत तंत्रज्ञाच्या कुटुंबाला 40 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रधारी यादव नावाचे सुतारकाम करणारे तंत्रज्ञ सेटवर काम करत असताना त्यांना विजेचा धक्का बसला. गंभीर जखमी झालेल्या यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली असून त्यावेळी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री आलिया भट देखील त्या दिवशी शूटिंगसाठी उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.
चंद्रधारी यादव यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी भन्साळी प्रॉडक्शन्सने 40 लाखांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एप्लाॅईज (FWICE) ने या घटनेची पुष्टी करत चित्रपटांच्या सेटवर अधिक कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष बी एन तिवारी यांनी नुकसानभरपाईची रक्कम 50 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, मृत तंत्रज्ञांच्या मुली अजून लहान असून त्यांच्या शिक्षण आणि भविष्यासाठी अधिक आर्थिक मदतीची गरज आहे. तसेच, चित्रपटांच्या सेटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निश्चित कामाचे तास आणि अधिक सुरक्षित कार्यपरिसर उपलब्ध करून देण्याची मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे.
‘लव्ह अँड वॉर’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘ब्रह्मास्त्र’नंतर रणबीर-आलिया ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 21 जानेवारी 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Comments are closed.