अज्ञातांकडून लावलेल्या आगीत ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ जळून खाक; खेडमध्ये खळबळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगावजवळ असलेल्या ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला अज्ञात व्यक्तींने आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून संबंधित व्यावसायिकाचे सुमारे पन्नास हजार ते एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपुरकर यांच्या मालकीचे हे हॉटेल असून सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आगीची घटना घडली. स्थानिक नागरिकांनी ही बाब लक्षात येताच तात्काळ फोनद्वारे त्यांना माहिती दिली. मात्र, तोपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केल्याने संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले होते. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून आग लागण्यामागे नेमके कारण काय ? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. संबंधित मालकांशी संपर्क साधला असता, या ठिकाणी कोणताही वणवा लागल्याचे दिसून येत नसून ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेची अधिक चौकशी सुरू असून, अज्ञात व्यक्तींविरोधात कारवाईची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी याच हॉटेल पिकनिक पॉईंटच्या आवारात अवैधरित्या प्रवेश करून मद्यप्राशन करत असताना सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांनी पकडले होते. यावेळी त्यांना धमकी व मारहाण करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. आता पुन्हा एकदा जलाल राजपुरकर यांच्या हॉटेल पिकनिक पॉईंटला आग लागल्याची घटना समोर आल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Comments are closed.