लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; सर्वत्र हळहळ

हिंगोली : पुढील काही दिवसांत लगीनसराईची धामधूम पाहायला मिळेल, सर्वत्र लग्नमंडप सजतील आणि नवरदेवांच्या वराती देखील निघल्याचे पाहायला मिळेल. मात्र, लग्न (विवाह) जमत नसल्याने निराशाच्या गर्तेत गेलेली तरुणाई देखील पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात शेतकर्‍यांच्या (Farmers) मुलांच्या लग्नाची समस्या गंभीर बनली आहे. शेतकरी आंदोलन, शेतकरी कर्जमाफी यावर चर्चा सुरू असताना शेतीची दुरवस्था झाल्याने शेतकरी कुटुंबांत किती गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत याचे भयावह वास्तव अनेकदा सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यानुसार, अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न रखडलेली असून वयाची तिशी गाठल्यानंतर देखील केवळ मुली मिळेना म्हणून युवकांची लग्न होत नाहीत. त्यातच, हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कळमनुरी येथील एका 30 वर्षीय युवकाने लग्न जमत नसल्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा, मुलींच्या पालकांच्या अपेक्षा आणि पुरुष व महिला यांच्यातील जन्मदरात असलेली असमानता यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे, आधीच नोकरी नाही, त्यात लग्नासाठी छोकरीपण मिळत नसल्याने तरुणाई निराशेच्या गर्तेत गेल्याचं पाहायला मिळालं आहे. हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील धक्कादायक घटना समोर आली असून लग्न जमत नसल्याने चक्क युवकाने आपलं जीवन संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गजानन व्यवहारे असे मृत झालेल्या 30 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या तरुणाचे लग्न जमत नसल्याने त्याने स्वतःच्या शेतामध्ये झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.  याप्रकरणी, कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मुलांच्या लग्नाची समस्या अधिक गंभीर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

उच्च शिक्षित मुलांपुढेही तोच प्रश्न

एकीकडे शेतीमालाला भाव नसल्याने व शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला असून शेतकऱ्याची कुटुंबसंस्थाच उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने जात असल्याचे वास्तव काही सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यात, मराठवाड्यातील विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असून शेतीला पाणी नाही, आणि पिकवलेल्या मालाला भाव नाही म्हणून शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचं पाऊल उचलताना दिसून येतात. विशेष म्हणजे काही मुले पदवीधर, पदव्युत्तर असूनही त्यांच्यापुढे देखील लग्नाची समस्या ठाण मांडून उभी आहे.

हेही वाचा

नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया

अधिक पाहा..

Comments are closed.