गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटीं
उन्मेष पाटील: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji) येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची (Devagiri Nagari Sahkari Bank Limited Chalisgaon Branch) तब्बल 5 कोटी 33 लाख 85 हजार 356 रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते आणि माजी खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील (Unmesh Patil), तसेच संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव या चार जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर स्थानिक आणि राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ‘उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या नावाने औद्योगिक कर्ज घेतले गेले होते. कर्जाची रक्कम परतफेड न केल्याने ते एनपीए (Non-Performing Asset) घोषित झाले. त्यानंतर बँकेने कंपनीला परतफेडीसाठी संधी दिली, परंतु ती न झाल्याने बँकेने कायदेशीर कारवाई सुरू केली.
Unmesh Patil: उन्मेष पाटलांवर गुन्हा दाखल
मात्र, या काळात कंपनीच्या संचालकांनी बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी संगनमताने विकली, असा गंभीर आरोप बँकेने केला आहे. त्यामुळे बँकेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव या चौघांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि इतर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपासाची सुरुवात झाली आहे. आरोपींनी मशिनरी विक्रीसाठी कोणते कागदपत्रे वापरली, विक्रीतून मिळालेली रक्कम कुठे वळवली आणि बँकेला दिशाभूल करण्यात आली का, याबाबत चौकशी सुरू आहे.
Girish Mahajan: गिरीश महाजनांनी केला होता आरोप
गेल्या काही दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यात भूखंड व्यवहारावरून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच उन्मेष पाटील यांनी स्टेट बँकेसह इतर बँकांनाही गंडवले असल्याचा आरोप केला होता. त्या वक्तव्यानंतर केवळ तीन दिवसांनी या फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने या घटनेला राजकीय रंग चढल्याची चर्चा आहे.
Shiv Sena UBT: ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी ही घटना मोठी अडचण मानली जात आहे. उन्मेष पाटील हे या भागातील प्रभावशाली नेते असून, त्यांच्या नावावर असा गंभीर गुन्हा नोंदवल्यामुळे सत्ताधारी हा मुद्दा चांगलाच उचलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.