गेल्या 12 वर्षात देशाची अभूतपूर्व प्रगती

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन : राहुल गांधींच्या आरोपांचा घेतला ‘समाचार’

पंतप्रधानांचा पलटवार…

तुम्ही सर्वांना चोर समजणे कधी थांबवणार? सकाळ-संध्याकाळ दुसऱ्यांचा अपमान करून देशाची प्रगती होत नाही. देशाच्या विकासासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने प्रयत्नशील आहोत.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

आज भारताची प्रगती खूप वेगाने सुरू आहे. तसेच लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचा वेग अभूतपूर्व असल्याचे प्रतिपादन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जागतिक बँकेचा नवीनतम अहवाल आम्हा सर्वांना अभिमानाने भरून टाकतो. केवळ 12-13 वर्षांत भारतातील 50 कोटी लोकांनी गरिबीवर मात केल्याची वस्तुस्थिती पंतप्रधानांनी दिल्लीत ‘फिक्की’च्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना मांडली. याप्रसंगी पंतप्रधानांनी विरोधी पक्षांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सकाळ-संध्याकाळ दुसऱ्यांचा अपमान करून देशाची प्रगती होत नाही, असा सल्ला देतानाच ‘तुम्ही सर्वांना चोर समजणे कधी थांबवणार?’ असा प्रश्नही पंतप्रधानांनी उपस्थित केला.

दिल्लीत सुरू असलेल्या ‘फिक्की’च्या शताब्दी परिषदेत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतानाच पंतप्रधानांनी विरोधी पक्षांना जाब विचारण्याची संधीही सोडली नाही. देशाची प्रगती केवळ शेतकरी, छोटे उद्योजक, उद्योग, संपत्ती निर्माण करणारे आणि करदाते यांचा आदर करूनच होते. सकाळ-संध्याकाळ त्यांचा अपमान करून देशाची प्रगती होऊ शकत नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

आम्ही 2014 मध्ये मूलभूत कॉर्पोरेट कर दर 30 वरून 22 टक्क्यांपर्यंत कमी केला आणि आज 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर लागत नाही. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले किंवा अधिक लोकांना कामावर ठेवले का? आम्ही रिटर्न आणि रिफंड प्रक्रिया देखील सोपी केली आहे; जिथे पूर्वी रिफंड मिळायला आठ महिने लागायचे, तिथे आता एका आठवड्यात मिळतो, असे पंतप्रधान म्हणाले.

50 कोटी लोक गरिबीतून बाहेर

1970 च्या दशकात, जेव्हा ‘गरिबी हटाओ’ ही घोषणा देण्यात आली, तेव्हा भारताची लोकसंख्या सुमारे 50 कोटी होती. तेव्हाही गरिबीचे निर्मूलन करता आले असते, पण फिक्की या गोष्टीची साक्ष आहे की त्यावेळची धोरणे सदोष होती आणि दुर्दैवाने त्यात योग्य हेतूचा अभाव होता. आम्ही योग्य धोरणांनी आणि योग्य हेतूने काम करत केवळ 12-13 वर्षांत 50 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले असेही मोदींनी निक्षून सांगितले.

Comments are closed.