साहेब! माझ्या बाळाला जिवंत करा, नवजात बाळाची बॉडी पिशवीत घेऊन वडील डीएम ऑफिसमध्ये, आपबिती ऐकून

UP News: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात पैशांच्या लोभाने एका खासगी रुग्णालयाने अमानुष कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या गर्भवती महिलेला उपचार नाकारण्यात आले, कारण तिच्या नातेवाईकांकडे डॉक्टरांनी मागितलेली पूर्ण रक्कम नव्हती. या निर्दयी वर्तनाची किंमत एका नवजात बाळाला जीव गमवून मोजावी लागली.

भिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भानपूर गावातील रहिवासी विपिन गुप्ता यांनी आपल्या पत्नीला महेवागंज येथील गोलदार हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. नॉर्मल डिलिव्हरीसाठी १० हजार, छोट्या ऑपरेशनसाठी १२ हजार आणि मोठ्या ऑपरेशनसाठी तब्बल २५ हजार रुपये खर्च सांगितला गेला. मात्र, गुप्ता यांनी ८ हजार रुपये जमा केले होते. उर्वरित पैसे न दिल्याने रुग्णालय प्रशासनाने अमानुष पाऊल उचलले.

गर्भवतीला चार परिचारिकांकडून स्ट्रेचरवर टाकून

डॉक्टरांनी वेदनांनी विव्हळणाऱ्या गर्भवतीला चार परिचारिकांकडून स्ट्रेचरवर टाकून थेट रुग्णालयाबाहेर काढले. या कठोर वागणुकीमुळे कुटुंबीयांनी पत्नीला तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवले. मात्र, उशीर झाल्याने शस्त्रक्रियेदरम्यान बाळाचा मृत्यू झाला.या घटनेनंतर पती विपिन गुप्ता हादरून गेले. आपल्या पत्नीला नवजात बाळ मरण पावल्याची बातमी कशी सांगायची, हे त्यांना सुचत नव्हते. त्यामुळे त्यांनी बाळाचा मृतदेह पिशवीत ठेवला आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. “माझं बाळ मला परत द्या, माझी पत्नी बाळ मागते आहे, मी तिला खोटं सांगतो आहे,” अशी हृदयद्रावक विनवणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीही हा प्रसंग पाहून सुन्न झाले. तत्काळ मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) डॉ. संतोष गुप्ता आणि एसडीएम सदर अश्विनी कुमार सिंह यांनी रुग्णालयात धाव घेतली. घटनास्थळी चौकशी केल्यानंतर डीएम यांच्या आदेशानुसार रुग्णालय सील करण्यात आलं.

दरम्यान, इतर रुग्णांना जिल्हा महिला रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. स्थानिकांमध्ये प्रचंड संताप असून, डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. कुटुंबियांनी डॉक्टरांवर भ्रूणहत्या आणि रुग्णाच्या जीवाशी खेळल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पैशांच्या हव्यासाने एका निरपराध जीवाचा बळी गेला असून, प्रशासनाने अशा रुग्णालयांवर नियंत्रण ठेवावे, अशी जनतेची मागणी आहे.

आणखी वाचा

Comments are closed.