ट्रेनच्या तिकिटांवर 20 टक्के सवलत

रेल्वेची ‘राउंड ट्रिप पॅकेज’ योजना : परतीच्या प्रवासाचे तिकीटही काढण्याची अट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशभरात जेव्हा जेव्हा सण येतात तेव्हा जवळजवळ प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी दिसून येते. लोकांना हजारो किलोमीटर उभे राहून प्रवास करावा लागतो. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या गर्दीसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी एक मोठी भेट दिली आहे. त्यानुसार, जर तुम्ही एकत्र ये-जा करण्यासाठी तिकिटे बुक केली तर तुम्हाला 20 टक्के सूट दिली जाईल. याबाबत रेल्वे मंत्रालयाने ‘राउंड ट्रिप पॅकेज’ योजना सुरू केली आहे.

दिवाळी आणि इतर सणांमध्ये घरी जाणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू केली आहे. यामध्ये, जर कोणी एकत्र ये-जा तिकिटे बुक केली तर परतीच्या तिकिटावर 20 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. याचा फायदा घरी जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी रेल्वेच्या प्रवासाला पसंती देणाऱ्यांना होणार आहे. या योजनेंतर्गत आरक्षण करताना काही महत्त्वाच्या अटीही असतील. मुख्य म्हणजे प्रवाशाने एकदा तिकीट काढल्यानंतर त्याचा परतावा (रिफंड) मिळणार नाही. तसेच तिकिटात कोणतेही बदल किंवा सुधारणा करता येणार नाहीत. या योजनेअंतर्गत सवलतीचे पास, कूपन, पीटीओ इत्यादी वैध राहणार नाहीत, असेही रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

बुकिंग 14 ऑगस्टपासून सुरू

रेल्वेने जारी केलेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत 14 ऑगस्टपासून बुकिंग सुविधा सुरू होईल. या सवलतीचा फायदा घेण्यासाठी 13 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत जाण्यासाठी आणि परतीसाठी 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 दरम्यानच्या प्रवासासाठी तिकिटे बुक करावी लागतील. या तारखेसाठी ‘कनेक्टिंग जर्नी फीचर’द्वारे परतीच्या प्रवासाचे तिकीट आरक्षित होणार आहे. शताब्दी एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस, सुविधा एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस यासारख्या फ्लेक्सी फेअर गाड्यांवर ही सवलत लागू होणार नाही. परंतु याशिवाय, सर्व श्रेणी आणि विशेषत: ऑन-डिमांड गाड्या म्हणजेच उत्सव विशेष गाड्या या सवलतीच्या कक्षेत समाविष्ट आहेत.

बुकिंगवर सूट अशी असेल…

ट्रेन एका जोडीची असावी : जर तुम्ही अहमदाबाद एक्स्प्रेसने पाटण्याला गेलात तर तुम्हाला परतीच्या ट्रेनच्या त्याच जोडीने परतीचे तिकीट बुक करावे लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही अहमदाबाद-बरौनी येथून गेलात तर परतीचा प्रवास बरौनी-अहमदाबाद या ट्रेनच्या त्याच जोडीने करावा लागेल.

तिकिटाची माहिती समान असावी : तिकिटात दिलेली सर्व माहिती सारखीच असावी. म्हणजेच, दोन्ही तिकिटांमध्ये स्रोत आणि गंतव्यस्थान (कुठून कुठपर्यंत), प्रवाशाचे नाव, वय, अंतर आणि वर्ग (स्लीपर, 3 एसी, 2 एसी) यासारख्या गोष्टी सारख्याच असाव्यात.

 

Comments are closed.