इराणच्या जहाजांची माहिती द्या,1.5 कोटी डॉलर्सचे बक्षीस मिळवा; अमेरिकेची मोठी घोषणा
अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीनंतरही तणाव वाढत आहे. अमेरिकेने इराणच्या बंदरांवर नाकेबंदी केली असून, इराणचे तेल वाहून नेणाऱ्या जहाजांना होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्यापासून रोखले आहे. तथापि, काही टँकर गुप्तपणे होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून आपल्या गंतव्यस्थानी पोहोचत आहेत. अमेरिकेच्या नाकेबंदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे अमेरिकेने आता इराणच्या तेल वाहतुकीविषयी माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या संघटनांशी संबंधित तेल वाहतुकीविषयी माहिती देणाऱ्यास 1.5 कोटी डॉलर्सपर्यंतचे बक्षीस जाहीर केले आहे. ‘रिवॉर्ड्स फॉर जस्टिस प्रोग्राम’ अंतर्गत जारी केलेल्या एका निवेदनात, अमेरिकेने म्हटले आहे की, त्यांना IRGC-संबंधित तेल वितरण, त्यात सामील असलेले टँकर, संस्था आणि या कथित बेकायदेशीर हस्तांतरणात सहभागी असलेल्या व्यक्तींविषयी माहिती हवी आहे. याची माहिती दिल्यास, आम्ही त्यांना १.५ कोटी डॉलर्सचे बक्षीस देऊ, अशी घोषणा अमेरिकेने केली आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढत आहे. इराणच्या बंदरांवरील नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने इराणची ६० हून अधिक जहाजे परत केली आहेत. आता, अमेरिकेने याच नाकेबंदी कठोर करण्यासाठी माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे. ही घोषणा इराणविरुद्धच्या अमेरिकेच्या नाकेबंदी मोहिमेचा एक भाग आहे, जी तेल निर्यात, जहाज वाहतूक जाळे आणि आयआरजीसीशी संबंधित आर्थिक मार्गांवर निर्बंध लादते.
रविवारी, वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालात, यूएस सेंट्रल कमांड (CENTCOM) चा हवाला देत म्हटले आहे की, गेल्या महिन्यात इराणच्या बंदरांवर नाकेबंदी लागू झाल्यापासून अमेरिकी सैन्याने इराणच्या बंदरांवर येणारी किंवा जाणारी ६१ व्यापारी जहाजे परत पाठवली आहेत.त्यातच आता अमेरिकेने केलेल्या घोषणेमुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Comments are closed.