अमेरिकेचा आखाती देशांसोबत मोठा ‘गेम’; बनला मोठा तेल निर्यातदार देश
अमेरिका-इराण युद्ध आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे आशिया आणि युरोपचा आखाती देशांमधील संपर्क तुटला आहे. त्यामुळे जगभरात तेल आणि नैसर्गिक वायूचे संकट निर्माण झाले आहे. या युद्धातून अमेरिकेने खूप कमाई केली आहे, असे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्यासोबतच अमेरिकेने आखाती देशांसोबत मोठा गेम केला असून आता अमेरिका जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार बनला आहे. आखातातील अशांतता आणि होर्मुझ सामुद्रधुनीचा बंद असलेला मार्ग या संधीचा फायदा घेत अमेरिका जगाला मोठ्या प्रमाणात तेल आणि नैसर्गिक वायू विकत आहे. तसेच जगातील अनेक देशांना अमेरिकेकडून तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
याआधी तेल निर्यातदार देशांमध्ये रशियाचा समावेश होता. मात्र, युक्रेन युद्धाचे कारण देत त्यांच्या तेल आणि नैसर्गिक वायू आयातीवर बंदी घालण्यात आली. तसेच त्याआधी इराण आणि इराकवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलावर कारवाई करत त्यांचे तेल साठेही जप्त केले. इराणशी युद्ध करून आता अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव निर्माण केला आहे. त्यामुळे या मार्गाने होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. ती आखाती देशांना हिंदुस्थान, तीन आणि इतर आशियाई देशातील प्रमुख तेल आयातदार देशांशी जोडते.
होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे सौदी अरेबिया, यूएई आणि कतारसारख्या देशांकडून होणारा तेल पुरवठा थांबला आहे. अमेरिकेच्या या गेममुळे जग तेल आणि नैसर्गिक वायूसाठी अमेरिकेवर अवलंबून झाले आहे. अमेरिकेवरही एकेकाळी तेल निर्बंध लादण्यात आले होते. रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, अनेक दशकांपासून अमेरिका तेलासाठी आखाती देशांवर अवलंबून होती आणि १९७३ मध्ये, काही ओपेक सदस्यांनी इस्रायलला पाठिंबा दिल्यामुळे अमेरिकेवर तेल निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, २०१० नंतर अमेरिकेचे नशीब पालटू लागले, जेव्हा त्याच्या शेल साठ्यांमधून तेल आणि वायूचे उत्पादन झपाट्याने वाढले. त्यामुळे ते प्रथम जगातील अव्वल वायू उत्पादक आणि आता जगातील अव्वल तेल उत्पादक बनले आहेत.
फेब्रुवारी २०२६ पासून अमेरिका-इराण युद्धामुळे सौदी अरेबियाच्या तेल निर्यातीत अडथळा आल्याने आणि युक्रेनवरील हल्ल्यांबद्दल मॉस्कोवर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाच्या तेल निर्यातीवर परिणाम झाल्याने, अमेरिका जगातील अव्वल तेल निर्यातदार बनला आहे.
उच्च उत्पादन आणि सामरिक साठ्यांच्या उपलब्धतेमुळे मे महिन्यात अमेरिकेची कच्चे तेल आणि ऊर्जा निर्यात दररोज जवळपास १०.५ दशलक्ष बॅरलपर्यंत पोहोचली. जहाज ट्रॅकिंग सेवा ‘वॉर्टेक्सा’च्या आकडेवारीनुसार, अमेरिका सलग तिसऱ्या महिन्यासाठी जगातील अव्वल निर्यातदार देश राहिला आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, मे महिन्यात रशियाची निर्यात दररोज ७ दशलक्ष बॅरल होती, तर व्होर्टेक्साच्या माहितीनुसार सौदी अरेबियाची निर्यात दररोज ५.९ दशलक्ष बॅरल होती. या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये सौदी अरेबियाने दररोज सुमारे ८.१ दशलक्ष बॅरल, तर अमेरिकेने दररोज ६.६ दशलक्ष बॅरल आणि रशियाने दररोज सुमारे ५.८ दशलक्ष बॅरल निर्यात केली.
Comments are closed.