व्यापार युद्ध टळले! अमेरिका आणि चीन यांच्यात 90 दिवसांसाठी टॅरिफ सवलत करार वाढला

अमेरिका आणि चीनने एकमेकांवर कर न लादण्याचा करार 90 दिवसांसाठी वाढवला आहे. सध्याचा करार संपण्याच्या बेतात असताना हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. या आदेशात मे महिन्यात झालेल्या कराराचे समर्थन करण्यात आले आहे. त्यावेळी दोन्ही देशांनी एकमेकांच्या वस्तूंवर लावलेले कर तात्पुरते स्थगित केले होते.
दरम्यान, याआधी कराराचा कालावधी वाढवला नाही तर मंगळवारपासून उच्च शुल्क लादले जाईल, असा इशारा अमेरिकेने दिला होता. तर गेल्या महिन्यात झालेल्या चर्चेत चीनने सांगितले होते की, दोन्ही बाजू करार कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. त्यावेळी अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, ते ट्रम्प यांच्या अंतिम मंजुरीची वाट पाहत आहेत. एप्रिलमध्ये व्यापाराबाबतचा तणाव शिगेला पोहोचला होता. ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांच्या वस्तूंवर शुल्क लादण्याची घोषणा केली होती. चीनवरही उच्च शुल्क लादण्यात आले होते, ज्याला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकन वस्तूंवर शुल्क वाढवले होते.
Comments are closed.