अमेरिकेने 50 टक्के व्यापार दर लादला

भारतही आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज, आर्थिक धोरणासंबंधी ठोस निर्णय घेणार, उद्योगांना संरक्षण

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लागू पेलेले 50 टक्क्यांचे व्यापारशुल्क बुधवारपासून कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या अनेक वस्तूंवरील करांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. याचा परिणाम निर्यातीवर आणि उद्योगांवर मोठ्या प्रमाणात होणे शक्य आहे. भारताची अमेरिकेला होणारी वस्तू निर्यात साधारणत: 87 अब्ज डॉलर्सची आहे. या निर्यातीमधील 50 टक्क्यांहून अधिकवर या करवाढीचा परिणाम होणार आहे.

विशेषत: भारताच्या ‘श्रमसघन’ (जेथे अधिक कामगार लागतात) उद्योगांवर आणि उत्पादनांवर या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होईल, असे बोलले जात आहे. या उद्योगांमध्ये मंदी येऊ शकते. तसेच अनेक कामगारांचा रोजगारही जाऊ शकतो, असे मत काही उद्योग संस्थांनी व्यक्त केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि औषधे यांना या करापासून मुक्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्यातरी त्यांच्या निर्यातीवर कोणताही परिणाम संभवत नाही. तसेच संपूर्ण सेवा निर्यातही अमेरिकेने आतापर्यंत तरी करमुक्त ठेवली आहे. त्यामुळे अमेरिकेला होणाऱ्या सर्व निर्यातीवर याचा परिणाम होणार नाही.

आतापासूनच कपात

अमेरिकेकडून 50 टक्के व्यापारशुल्काची घोषणा झाल्यापासूनच काही उद्योगांच्या ऑडर्स रद्द झाल्या आहेत. तर काही उद्योगांचे उत्पादन मंदावले आहे. ही स्थिती आणखी काही महिने राहिल्यास या व्यापारशुल्काचा जास्त तीव्र परिणाम दिसून येण्यास प्रारंभ होणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. वस्त्रप्रावरणे, चामड्याच्या वस्तू इत्यादी उत्पादने करणाऱ्या कंपन्यांना त्वरित फटका बसण्याची शक्यता आहे. देशातील बाजारपेठेत मागणी वाढली नाही किंवा पर्यायी विदेशी बाजारपेठ लवकर उपलब्ध झाली नाही, तर परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते, असे या क्षेत्रांमधील उद्योजकांचे म्हणणे आहे. तज्ञांनीही असेच मत व्यक्त केले.

भारताकडूनही उपाययोजना

ट्रम्प यांच्या 50 टक्के व्यापारशुल्काच्या आव्हानाचा कशाप्रकारे स्वीकार करण्यात येईल, यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मंगळवारी त्यांच्या कार्यालयाने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहे. अमेरिकेच्या वाढीव करांचा परिणाम सौम्य करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेषत: भारतीय शेतकरी, लघु आणि मध्यम उद्योग, कारागिर, मत्स्यपालक आणि पशुपालक यांच्या हिताचे रक्षण कोणत्याही तडजोडीखेरीज केले जाईल, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. भारत आपले निर्णयस्वातंत्र्य गमावणार नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. भारतात वस्तूंची मागणी वाढावी, यासाठी वस्तू-सेवा करात मोठ्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय झाला आहे.

भारतीय उद्योग सरसावले

अमेरिकेच्या व्यापारशुल्काशी दोन हात करण्यासाठी भारतातील उद्योगही आता सरसावल्याचे दिसून येत आहे. अनेक उद्योगांनी पर्यायी बाजारपेठांचा शोध घेण्यास प्रारंभ केला आहे. तसेच भारतातच ही उत्पादने खपावीत यासाठीही प्रयत्न चालविले आहे. काही उद्योजकांनी केंद्र सरकारकडून साहाय्य मागितले आहे.

होत्याचे नव्हते : नाटोची प्रतिक्रिया

अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लागू करण्याचा घेतलेला निर्णय या दोन देशांमधील संबंध बिघडविण्यास कारणीभूत ठरणारा आहे. भारताशी जवळीकीचे संबंध निर्माण करण्यासाठी अमेरिकेने गेल्या 25 वर्षांपासून पेलेल्या प्रयत्नांना या व्यापार शुल्कामुळे मोठा हादरा बसू शकतो, अशी प्रतिक्रिया नाटोने व्यक्त केली.

नेमका परिणाम काही कालावधीनंतर

ड अमेरिकेच्या या धोरणाचा नेमका परिणाम काही कालावधीनंतर दिसणार

ड भारत सरकार आणि भारतीय उद्योजक दोन हात करण्यासाठी सरसावले

ड केंद्र सरकारकडून आर्थिक साहाय्याचा निर्णय, देशातील मागणी वाढविणार

Comments are closed.