Israel Iran War – ब्रिटनचा अमेरिकेला दणका; युद्धात सहभागास नकार, होर्मुझबाबत 35 देशांची बैठक बोलावली
महिन्याभरापासून सुरू असलेले अमेरिका, इस्रायल- इराण युद्ध संपण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचे होत आहे. अमेरिका आपल्या अटींवर करार करण्याबद्दल बोलत आहे, तर इराणने त्याला स्पष्ट नकार दिला आहे. आम्ही इराणविरोधातील युद्धात सामील होणार नाही, असे ब्रिटनने स्पष्टपणे सांगत अमेरिकेला चांगलाच दणका दिला आहे.
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांनी स्पष्ट केले आहे की, ब्रिटन इराणच्या युद्धात सामील होणार नाही. त्याऐवजी, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी ते जागतिक होर्मुझ शिखर परिषदेचे आयोजन करणार आहेत. स्टारमर म्हणाले की, या आठवड्यात ब्रिटनच्या यजमानपदाखाली सुमारे ३५ देशांसोबत एक बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यावर चर्चा केली जाईल.
स्टारमर यांनी इशारा दिला की, इराण युद्धाचा ब्रिटनच्या भविष्यावर लक्षणीय परिणाम होईल, परंतु त्यांनी हे आश्वासनही दिले की त्यांचा देश या संकटाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्यांच्यावर आणि इतरांवर कितीही दबाव टाकला जात असला आणि कितीही गदारोळ निर्माण केला जात असला तरी, त्यांचे सर्व निर्णय ब्रिटिश नागरिकांच्या सर्वोत्तम हिताचे असतील. त्यामुळे, हे आमचे युद्ध नाही आणि आम्हाला त्यात ओढले जाण्याची इच्छा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (UNDP) म्हटले आहे की पश्चिम आशियातील युद्धामुळे संपूर्ण प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होऊ शकते. अहवालानुसार, हे युद्ध आता केवळ काही देशांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर संपूर्ण प्रदेशासाठी एक मोठे संकट बनले आहे.
इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेला पाठिंबा देण्यास नाटो देशांनी नकार दिला आहे. त्यातच ब्रिटननेही युद्धात अमेरिकेची साथ देण्यास नकार दिल्याने ट्रम्प यांची अडचण झाली आहे. अमेरिकेची इच्छा होती की नाटो देशांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आपली युद्धनौका पाठवावी, परंतु त्यांनी नकार दिला. त्यामुळे आता ट्रम्प काय भूमिका घेणार आणि ब्रिटनमधील 35 देशांच्या बैठकीकडे जगाचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.