US Iran War – होर्मुझच्या सामुद्रधुनीत हिंदुस्थानी मालवाहू जहाजावर ड्रोन हल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण युद्धादरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीत एका हिंदुस्थानी मालवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ ‘हाजी अली’ नावाच्या या जहाजावर ड्रोनने हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की संपूर्ण जहाज समुद्रात बुडाले. हा हल्ला कुणी केला हे अद्याप कळलेले नाही. हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत हे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, जहाजावर 14 खलाशी होते. या 14 खलाशांना वाचवण्यात आल्याचा दावा ओमानच्या नौदलाने केला आहे. हल्ला करण्यात आलेले हाजी अली हे मालवाहू जहाज गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यातील आहे. आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत हिंदुस्थानी जहाज बुडण्याची ही दुसरी घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी, 13 मे रोजी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास, हे जहाज सोमालियातील बेरबेरा येथून शारजाहकडे जात होते. ओमानमधील लिमाहजवळून जात असताना एका ड्रोनने जहाजावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली आणि ते समुद्रात बुडू लागले.

जहाजावरील 14 खलाशांनी तात्काळ आपत्कालीन संकेत दिले. ओमानच्या तटरक्षक दलाने तात्काळ प्रतिसाद देत सर्व हिंदुस्थानी खलाशांची सुटका करत त्यांना दिबा बंदरात नेण्यात आले. हाजी अली या जहाजाचे मालक सुलतान अहमद संघार यांनीही सर्व 14 खलाशांना सुखरूप वाचवण्यात आल्याची पुष्टी केली आहे. या खलाशांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जहाजावर कोणी हल्ला केला याचा तपास सुरू आहे.

हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ हिंदुस्थानचा ध्वज असलेल्या जहाजावर बुधवारी झालेला हल्ला अस्वीकार्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Comments are closed.