अमेरिका-इराण युद्ध अंतिम टप्प्यात आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्ध थांबवल्याचा दावा : इराणची मात्र कोणताही निर्णय झाला नसल्याची स्पष्टोक्ती

वृत्तसंस्था/ तेहरान, वॉशिंग्टन

अमेरिकेने इराणसोबतचे युद्ध संपवले असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी केली. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी इराण कधीही अण्वस्त्रs विकसित करणार नाही असाही दावा केला. मात्र, इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळत शांतता करारावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई म्हणाले. साहजिकच डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्ध समाप्तीच्या घोषणेत कितपत सत्यता आहे, याबाबत प्रश्नचिन्हच आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी नवीन कराराला मंजुरी दिल्याचे सांगितले. या आठवड्यात युरोपमध्ये इराणसोबत शांतता करारावर स्वाक्षरी केली जाऊ शकते. सर्व काही सुरळीत पार पडल्यास, उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स हे देखील करार पूर्ततेसाठी तेथे उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांच्या या माहितीनंतर बहुतांश आंतरराष्ट्रीय माध्यमांनी चालू आठवडाअखेरीस अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार होईल, असे वृत्त दिल्यानंतर भारतासह विविध शेअर बाजार निर्देशांक आणि चलनांमध्ये त्याचे सकारात्मक पडसाद दिसून आले.

अमेरिका आणि इराण यांच्यात या आठवड्याच्या अखेरीस शांतता करारावर स्वाक्षरी केली जाऊ शकते, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. या करारामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जलवाहतूक पुन्हा सुरू होऊ शकते. तथापि, इराणने अद्याप कोणत्याही अंतिम कराराची पुष्टी केलेली नाही. हा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे आणि काही महत्त्वाचे मुद्दे निश्चित व्हायचे आहेत, असे इराणने म्हटले आहे.

अद्याप कोणताही करार नाही : इराण

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठ्या कराराचा दावा इराणने फेटाळला आहे. तेहरानच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेसोबत अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाही. कराराच्या मसुद्याचे सध्या देशाच्या संबंधित संस्थांकडून पुनरावलोकन केले जात आहे. कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सांगितले. शांतता करार हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असून त्यावर संबंधित निर्णय घेणाऱ्या संस्था विचार करत आहेत, असेही बघाई यांनी स्पष्ट केले. वाटाघाटींच्या मसुद्याचा मोठा भाग अंतिम झाला आहे, परंतु चर्चेदरम्यान अमेरिकेने अनेकवेळा आपली भूमिका बदलली, असेही इराणचे म्हणणे आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील प्रस्तावित लष्करी हल्ला थांबवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर जागतिक बाजारात तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. शुक्रवारी ब्रेंट क्रूड 1.21 डॉलर्स म्हणजेच 1.3 टक्क्यांनी घसरून प्रतिबॅरल 89.17 डॉलर्सवर आले. दरम्यान, यूएस डब्ल्यूटीआय क्रूड 1.23 डॉलर्स म्हणजेच 1.4 टक्क्यांनी घसरून प्रतिबॅरल 86.48 डॉलर्सवर आले. साप्ताहिक आधारावर दोन्ही बेंचमार्कमध्येही घसरण दिसून आली.

करारातील तीन प्रमुख मुद्दे प्रलंबित

इराण आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित करार होऊनही, दोन्ही देशांमध्ये तीन प्रमुख वादग्रस्त मुद्दे सोडवले जाणे बाकी आहे. इराणची सरकारी वृत्तसंस्था, ‘इर्ना’नुसार, या मुद्यांवर पुढील 60 दिवसांत स्वतंत्रपणे चर्चा केली जाईल. ‘इर्ना’च्या अहवालानुसार, प्रलंबित मुद्यांमध्ये इराणचा शांततापूर्ण अणुकार्यक्रम सुरू ठेवणे, अमेरिकेने लादलेले निर्बंध हटवणे आणि युद्ध व संघर्षामुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई यंत्रणा स्थापन करणे यांचा समावेश आहे. सध्याच्या सामंजस्य करारामध्ये या तीन मुद्यांवर अंतिम तोडगा काढलेला नसल्यामुळे दोन्ही बाजू पुढील दोन महिने वाटाघाटी सुरू ठेवतील आणि या मुद्यांवर एकमत साधण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती उपलब्ध होत आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आमचेच पूर्ण नियंत्रण : इराण

अमेरिकेसोबत वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने पुन्हा एकदा होर्मुझच्या सामुद्रधुनीवर पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा केला आहे. इराणच्या परवानगीशिवाय कोणतेही जहाज या सागरी मार्गातून जाऊ शकत नाही, असे इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी अॅडमिरल हबीबोल्लाह सय्यारी यांनी सांगितले. अलीकडील हल्ल्यांमध्ये इराणी नौदलाचे मोठे नुकसान झाल्याचा अमेरिकेचा दावाही सय्यारी यांनी फेटाळून लावला. या प्रदेशात इराणने अजूनही आपली प्रभावी लष्करी क्षमता टिकवून ठेवली आहे, असे ते पुढे म्हणाले.

Comments are closed.