अमेरिका-इस्रायलची कारवाई चुकीची, जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी लष्करी कारवाईवर उपस्थित केले सवाल
जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आंतरराष्ट्रीय वादांचे निराकरण लष्करी बळाने किंवा हिंसेतून करण्याऐवजी चर्चा आणि मुत्सद्देगिरीने व्हायला हवं, असं ते म्हणाले आहेत.
या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, कोणत्याही देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या करणे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चुकीचे उदाहरण आहे. जर अमेरिका आणि इस्रायलची ही लष्करी कारवाई समर्थनीय मानली गेली, तर मग रशियाने युक्रेनमध्ये जे काही केले त्यालाही योग्यच म्हणावे लागेल का? असा सवाल त्यांनी केला. इतकेच नव्हे तर, भविष्यात जर हिंदुस्थाननेही अशाच प्रकारचे पाऊल उचलले, तर जागतिक स्तरावर त्यालाही मान्यता मिळेल का, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
परदेशात, विशेषतः इराणमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दलही ओमर अब्दुल्ला यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. तिथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी शासन सतत संपर्कात असून, त्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारशी समन्वय साधून या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments are closed.