इराणच्या अणुसाठ्यावर अमेरिका-इस्रायलची नजर; विशेष सैन्य पाठवण्याच्या योजनेवर चर्चा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इस्त्रायल यांनी आता इराणमधील युरेनियमचा साठा ताब्यात घेण्यासाठी पाऊल उचलले आहे. इराणमध्ये युरेनियमचा साठा अत्यंत समृद्ध असल्याने, हा साठा जप्त करण्याकरता कोणती पावले उचलता येतील यावर आता चर्चा सुरु झाली आहे. वृत्तानुसार भविष्यात गरज पडल्यास इराणमध्ये विशेष सैन्य पाठवून तेथील अणु सामग्री ताब्यात घेण्याची योजना विचाराधीन आहे.

माहितीनुसार, इराणकडे सुमारे ४५० किलो ६० टक्के समृद्ध युरेनियम साठा आहे. तज्ज्ञांच्या मते हे युरेनियम काही काळातच ९० टक्क्यांपर्यंत समृद्ध करून अण्वस्त्रांसाठी वापरता येऊ शकते. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल या साठ्याकडे संभाव्य सुरक्षा धोका म्हणून पाहत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळू दिली जाणार नाहीत. त्यामुळे या संदर्भात विविध लष्करी पर्यायांवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, जर ही मोहीम राबवली गेली तर अमेरिकन किंवा इस्रायली विशेष सैन्याला थेट इराणच्या भूमीवर उतरून कडक सुरक्षा असलेल्या भूमिगत अणु सुविधांपर्यंत पोहोचावे लागेल. तेथील युरेनियम साठा जप्त करणे किंवा त्याची क्षमता कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असू शकतो. परंतु ही कारवाई तात्काळ होण्याची शक्यता नसून इराणची लष्करी ताकद कमकुवत झाल्यानंतरच अशा प्रकारची मोहीम सुरू होऊ शकते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या संभाव्य मोहिमेत विशेष सैन्याबरोबरच अणुशास्त्रज्ञांचाही समावेश असू शकतो. या मोहिमेसाठी दोन पर्यायांवर चर्चा होत असल्याचे सांगितले जाते. पहिला पर्याय म्हणजे इराणमधील युरेनियम पूर्णपणे बाहेर काढणे, तर दुसरा पर्याय म्हणजे त्या अणु सुविधांमधील समृद्धी प्रक्रिया कायमची कमी करणे. अधिकाऱ्यांच्या मते, ही मोठ्या युद्धासारखी कारवाई नसून अत्यंत मर्यादित आणि अचूक विशेष लष्करी ऑपरेशन असण्याची शक्यता आहे.

Comments are closed.