Us Israel Iran War – इराणचा कतार आणि यूएईमध्ये क्षेपणास्त्र हल्ला, जगातील सर्वात मोठ्या LNG प्लांटचे मोठे नुकसान
पर्शियन आखातामध्ये सुरू असलेला संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. इराण देखील हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत शेजारील देशांवर हल्ले करत आहे. इराणने गुरुवारी सकाळी कतारमधील जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू (LNG) निर्यात प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात रास लाफान इंडस्ट्रियल सिटी संकुलाचे मोठे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जगातील एकूण एलएनजी पुरवठ्यापैकी सुमारे 20 टक्के वाटा या प्रकल्पाचा असून, या हल्ल्यामुळे जागतिक वायू पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. इराणने कतारसोबतच संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील हबशान गॅस फॅसिलिटीवरही हल्ला केला. हल्ल्यानंतर हबशान फॅसिलिटी बंद करण्यात आली आहे. तसेच सौदी अरेबियाने देखील त्यांच्या पूर्व भागातील गॅस फॅसिलिटीवर झालेला ड्रोन हल्ला हाणून पाडल्याचा दावा केला आहे.
दक्षिण पार्स नैसर्गिक वायू क्षेत्रावरील हवाई हल्ल्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल कतार, सौदी आणि युएईमधील ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. दरम्यान, या हल्ल्यानंतर जागतिक बाजारात तेलाच्या किमतींत आणखी 5 टक्क्यांनी वाढ झाली असून, प्रति बॅरल 108 अमेरिकी डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. यामुळे पेट्रोल आणि इतर वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून तेलासाठी जागतिक बेंचमार्क असलेल्या ब्रेंट क्रूडची किंमत जवळपास 50 टक्क्यांनी वाढली आहे.
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. हा हल्ला देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी धोका असल्याचे कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
या हल्ल्यामुळे गॅसच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता ऊर्जा तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हा प्रकल्प पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू व्हायला वेळ लागू शकतो. यामुळे आशिया आणि युरोपमधील देशांना ऊर्जेच्या टंचाईचा सामना करावा लागू शकतो, असेही तज्ज्ञांनी नमूद केले.
Comments are closed.