US Iran Attacks अमेरिकेचे पुन्हा नव्याने हल्ले; इराणकडून आखातातील अमेरिकन तळांना लक्ष्य, होर्मुझची सामुद्रधुनी बंद?

अमेरिका – इराणमधील तणाव वाढत चालला असून पु्न्हा एकदा हल्ले प्रतिहल्ले सुरू झाले आहेत. अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने जाहीर आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या वॉर सेक्रेटरींनी इस्लामिक रिपब्लिकवर ‘जोरदार’ हल्ला करण्याची चेतावणी दिल्यानंतर काही वेळातच त्यांनी इराणमधील अनेक लक्ष्यांवर स्वसंरक्षणार्थ हल्ले केले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या हल्ल्यांच्या सत्रात इराणमधील पश्चिमेकडील तेहरान, फार्स प्रांत, बंदर अब्बास, केश्म बेट, किश, मिनाब आणि मध्य इस्फहानमधील काही भागांसह अनेक भागांना लक्ष्य करण्यात आले आहे.

याला प्रत्युत्तर म्हणून, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) सांगितले आहे की त्यांच्या हवाई दलाने आणि नौदलाने या भागात असलेल्या अमेरिकन सैन्याविरुद्ध दोन टप्प्यांत धडक कारवाई केली आहे, असे वृत्त ‘तस्नीम’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. या हल्ल्यांमध्ये अमेरिकन सैन्य असलेल्या तळांवरील १८ प्रमुख ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

याव्यतिरिक्त, आयआरजीसीने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी ‘सर्व प्रकारच्या जहाजांसाठी’ बंद केली आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, आयआरजीसीच्या सूत्राने सांगितले की, ‘या भागात निर्माण झालेल्या असुरक्षिततेमुळे, होर्मुझची सामुद्रधुनी तेलवाहू जहाजे आणि व्यापारी जहाजांसह सर्व प्रकारच्या जहाजांच्या वाहतुकीसाठी तातडीने बंद घोषित करण्यात येत आहे.’

सेंट्रल कमांडने (CENTCOM) केला होर्मुझ बंद असल्याच्या दाव्याचा ‘फॅक्ट-चेक’

यानंतर काही वेळातच, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याचा इराणचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी आयआरजीसीच्या निवेदनाचा फॅक्ट-चेक करत नोंदवले की, या नुकत्याच झालेल्या हल्ल्यांनंतरही ‘रात्री व्यापारी जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून नेहमीप्रमाणे आत आणि बाहेर प्रवास करत आहेत.’

इराणवर टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचे ट्रम्प यांचे वक्तव्य

फॉक्स न्यूजशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराणने अमेरिकेच्या मध्यस्थांनी मांडलेल्या शांतता करारावर स्वाक्षरी केली नाही, तर अमेरिकन सैन्य “उद्या रात्री” पुन्हा बॉम्ब हल्ले करेल. तसेच यावेळी बोलताना त्यांनी एका अपशब्दाचा वापर केल्याचे समजते.

ट्रम्प यांनी असेही सांगितले की ‘इराणमधील दूर्गम भागातील लक्ष्यांवर मारा करण्यासाठी ४९ टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला, ज्यातील काही लक्ष्ये इराणची राजधानी तेहरानपासून अवघ्या ६४ किमी अंतरावर होती.’

ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेची लढाऊ विमाने देखील इराणच्या आकाशात घिरट्या घालत आहेत आणि पर्शियन गल्फच्या जवळ असलेल्या देशाच्या नैऋत्य भागातील रडार यंत्रणा आणि हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट करत आहेत, असे फॉक्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी असा दावाही केला की इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना फोन केला आणि अमेरिकेला ही बॉम्ब हल्ले थांबवण्याची विनंती केली.

इराणचा इशारा

आयआरजीसीच्या हवाई दलाचे कमांडर ब्रिगेडियर जनरल मजीद मौसवी यांनी चेतावणी दिली की, जर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती अस्थिर केली, तर इराण संपूर्ण परिसरात चोख प्रत्युत्तर देईल.

ते म्हणाले, ‘जर तुम्ही पवित्र होर्मुझच्या सामुद्रधुनीला असुरक्षित केले, तर आम्ही संपूर्ण इराणमधून तुमच्यासाठी या परिसराला नरक बनवू.’

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाला देत इराणच्या माध्यमांनी हे वृत्त देखील दिले आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर थेट चर्चा केल्याचा केलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. या वृत्तांनुसार, दोन्ही बाजूंमध्ये असा कोणताही संपर्क झालेला नाही.

बहारिनमध्ये वाजले हवाई हल्ल्याचे सायरन

आयआरजीसीने आखातातील अमेरिकन तळांवर हल्ला केल्याचे सांगितल्यानंतर बहारिनमधील अनेक ठिकाणी हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू आले. देशाच्या गृह मंत्रालयाने नागरिकांना ‘शांत राहण्याचे आणि जवळच्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचे’ आवाहन केले आहे.

Comments are closed.