US Attacks Iran अमेरिकेकडून इराणच्या ‘बंदर अब्बास’वर हल्ला, ‘आत्मसंरक्षणार्थ’ हल्ले केल्याचा दावा

आखातातील तणाव कायम असून अमेरिकच्या लष्कराने इराणच्या दक्षिणेकडील भूभागावर हल्ले केल्याचे वृत्त आहे. यावेळी इराणचे क्षेपणास्त्र तळ आणि समुद्रात सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बोटींना लक्ष्य केल्याचे कळते आहे. अमेरिकेने या कारवाईला ‘आत्मसंरक्षणार्थ’ उचलेले पाऊल असे म्हटले आहे. दरम्यान, इराणचे मुख्य वाटाघाटी करणारे अधिकारी अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेले तीन महिन्यांपासून असलेली युद्ध परिस्थिती संपवण्याच्या संभाव्य करारावर चर्चा करण्यासाठी कतारच्या पंतप्रधानांसोबत दोहा येथे उपस्थित आहेत. अशावेळी हे हल्ले करण्यात आले आहेत.

अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) एका पत्रकात म्हटले आहे की, ‘इराणी सैन्याकडून आमच्या सैन्याला असलेला धोका लक्षात घेता, स्वसंरक्षणासाठी हे नवीन हल्ले करण्यात आले आहे. अमेरिकन संस्थेच्या माहितीनुसार, लक्ष्य करण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये क्षेपणास्त्र डागणारे सैन्य तळ आणि समुद्रात ‘सुरुंग पेरण्याचा’ प्रयत्न करणाऱ्या बोटींचा समावेश होता.

अमेरिकन सेंट्रल कमांडचे प्रवक्ते टिम हॉकिन्स यांनी सांगितले की, अमेरिकन लष्कराकडून ‘सुरू असलेल्या युद्धविरामादरम्यान संयम बाळगत आपल्या सैन्याचे रक्षण करणे सुरूच ठेवेल.’

‘न्यू यॉर्क टाईम्स’च्या एका रिपोर्टनुसार त्यांनी सांगितले की, अमेरिकेचे लक्ष्य बंदर अब्बासजवळील परिसर होता. इराणच्या दक्षिण किनारपट्टीवरील असलेले शहर आहे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवर स्थित असलेल्या इराणी नौदलाच्या तळाचे मुख्य केंद्र आहे.

इराणी सरकारी माध्यमांनीही यापूर्वी वृत्त दिले होते की, बंदर अब्बासमध्ये तीन मोठे स्फोटांचे आवाज ऐकू आल्यानंतर स्थानिक अधिकारी याचा तपास करत आहेत. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या माहितीनुसार, बंदर अब्बास विमानतळाजवळ स्फोटाचा आवाज ऐकू आला आहे. बंदर अब्बासमधील इराणची एअर डिफेन्स सिस्टम सक्रिय करण्यात आली आहे’.

इराणच्या दक्षिणेकडील भागातील बंदर अब्बास हे इराणच्या नौदल आणि हवाई दलाचे तळ असून ते होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी वसलेले आहे.

इराणच्या निम-सरकारी ‘फार्स न्यूज एजन्सी’ने प्रत्यक्षदर्शींचा हवाला देत वृत्त दिले आहे की, पर्शियन गल्फमधील सिरिक आणि जास्क जवळही अशाच प्रकारचे स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.

इराणच्या सशस्त्र दलांनी पर्शियन गल्फ भागात शत्रूचे एक ड्रोन नष्ट केल्याचे सांगितल्यानंतर हे हल्ले झाले आहेत.

Comments are closed.