अमेरिकेचे नौदल अधिकारी ट्रम्पना म्हणतात ‘इराणच्या युद्धनौका बुडवायला मजा येते’, आतापर्यंत 46 जहाजांना जलसमाधी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाने आतापर्यंत इराणच्या 46 अत्याधुनिक युद्धनौका बुडवल्याचा दावा केला आहे. वॉशिंग्टन डीसी येथे काँग्रेसमधील रिपब्लिकन सदस्यांच्या बैठकीत बोलताना ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाच्या कारवाईबाबत माहिती दिली.

या वेळी ट्रम्प यांनी एका लष्करी अधिकाऱ्यासोबत झालेल्या संभाषणाचाही उल्लेख केला. इराणी युद्धनौका ताब्यात घेऊन त्यांचा वापर करता येईल का, असा प्रश्न ट्रम्प यांनी विचारल्यावर त्या अधिकाऱ्याने “इराणच्या युद्धनौका बुडवायला मजा येते,” असे उत्तर दिल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

मध्यपूर्वेतील युद्ध किती काळ चालेल याबाबत ट्रम्प यांनी दिवसभरात वेगवेगळी विधाने केली. यापूर्वी एका अमेरिकन वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे युद्ध जवळपास संपल्यासारखे असल्याचे सांगितले. “युद्ध जवळजवळ पूर्ण झाले आहे. इराणकडे आता नौदल, संवाद व्यवस्था किंवा हवाईदल उरलेले नाही,” असे ट्रम्प यांनी CBS न्यूजला सांगितले. तसेच सुरुवातीला त्यांनी युद्धासाठी चार ते पाच आठवड्यांचा अंदाज व्यक्त केला होता; मात्र कारवाई अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने पुढे गेल्याचेही त्यांनी म्हटले.

मात्र काही तासांनंतर काँग्रेसमधील रिपब्लिकन सदस्यांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी युद्ध अद्याप पूर्ण झाले नसल्याचे सांगितले. “आपण अनेक बाबतीत जिंकले आहोत, पण अजून पुरेसे जिंकलेले नाही. इराणचा पूर्ण आणि निर्णायक पराभव होईपर्यंत युद्ध सुरू राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ट्रम्प यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने युद्ध कधी संपेल हे इराणच ठरवेल असे म्हटले आहे. अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले सुरू राहिले तर या प्रदेशातून एक लिटरही तेल बाहेर जाऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

या संघर्षामुळे होर्मूझ सामुद्रधुनी जवळजवळ बंद झाली आहे. जागतिक स्तरावर तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मार्गातून जहाजांची वाहतूक गेल्या आठवडाभरापासून ठप्प झाली आहे. त्यामुळे तेल उत्पादक देशांना साठवणूक क्षमता भरल्याने उत्पादन थांबवावे लागले आहे.

अमेरिका आणि इस्रायलने 28 फेब्रुवारीपासून इराणवर हल्ले सुरू केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल तसेच आखाती प्रदेशातील अमेरिकन तळ असलेल्या देशांवर हल्ले केले.

Comments are closed.