Israel Iran War – मुज्तबा खामेनी जिवंत आहेत की नाही माहीत नाही’; ट्रम्प यांनी नवा दावा करत खळबळ वाढवली
अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस वाढत चालले आहे. इराणकडून आखाती देशांध्ये सातत्यांने क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक विधाने केली. आता पुन्हा एकदा इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनींबाबत मोठा दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, मुज्तबा सध्या जिवंत आहेत की नाही, याची कोणालाच खात्री नाही. ते बऱ्याच काळापासून सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत. ट्रम्प यांच्या मते, जर ते जिवंत असतील तर त्यांनी आपल्या देशाच्या हितासाठी शरणागती पत्करावी, कारण अमेरिकन सैन्याने इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन शक्तीचे मोठे नुकसान केले आहे.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पेट हेगसेथ यांनीही मुज्तबा यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. इराणकडे आधुनिक कॅमेरे आणि रेकॉर्डिंगची साधने असतानाही नवीन नेता जगासमोर का येत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुज्तबा हे सध्या घाबरलेले असून ते लपून बसले असावेत, असा आरोप अमेरिकेकडून केला जात आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मुज्तबा यांच्या सोशल मीडियावरील फोटोंवर शंका उपस्थित करत ते ‘एआय’ (AI) द्वारे बनवलेले असावेत असा दावा केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर खामेनी यांचा मुलगा मुज्तबा खामेनेई याने इराणची सूत्रे हाती घेतली होती. पदभार स्विकारल्यानंतर मुज्तबा यांनी इस्रायल आणि अमेरिकन तळांवर हल्ले तीव्र केले होते. यादरम्यान मुज्तबा गंभीर जखमी झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. इराणने या बातम्या अफवा असल्याचे सांगत मुज्तबा पूर्णपणे सुरक्षित असून ते सैन्याचे नेतृत्व करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
सध्याची परिस्थिती पाहता इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की इराणला आता तडजोड करायची आहे, पण सध्याच्या अटी अमेरिकेला मान्य नाहीत. होर्मुजची सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक देश अमेरिकेला मदत करण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Comments are closed.