जपान आणि कोरियावर 25 टक्के टेरिफ, अमेरिकेने धाडले पहिले पत्र; ट्रम्प म्हणाले व्यापार अधिक मजबूत होईल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपान आणि कोरियावर 25 टक्के टेरीफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पहिले पत्र या दोन देशांना धाडण्यात आले. ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान इशिबा शिगेरू आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्यांग यांना पाठवण्यात आलेल्या पत्राचा क्रीनशॉट ट्रूथवरून शेअर केला आहे.

तुम्हाला पत्र पाठवणे ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. कारण, आपल्यातील व्यापारी संबंध त्यामुळे अधिक मजबूत होतील. अमेरिकेने तुमच्यासारख्या महान देशासोबत व्यापार करताना नुकसान झाले तरीही यापुढेही व्यापार करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण संतुलित आणि निष्पक्ष पद्धतीने व्यापार धोरणे राबवू असे ट्रम्प यांनी पत्रात लिहिले आहे. पुढील महिन्याच्या 1 ऑगस्टपासून जपान आणि दक्षिण कोरियात पाठवण्यात येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या मालावर 25 टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादण्यात येईल असे पत्रात नमुद करण्यात आले आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी डझनभर देशांच्या पत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या देशांनाही लवरकरच व्यापार आणि टेरिफबाबतचे पत्र पाठविण्यात येणार आहे.

ब्रिक्सची धोरणे अमेरिकाविरोधी -ट्रम्प

ब्रिक्समधील राष्ट्रांनी अमेरिकेच्या अतिरिक्त आयात शुल्क लादण्याच्या धोरणाला कडाडून विरोध केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड भडकले आहेत. ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांना जो देश पाठिंबा देईल त्या देशावर अतिरिक्त 10 टक्के आयात शुल्क लादण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेकडून 12 देशांना टेरीफ आणि व्यापार कराराबाबतचे पत्र पाठवण्यात येणार आहे. मला ही घोषणा करताना अत्यंत आनंद होत आहे की, जगभरातील देशांना अमेरिकेच्या वतीने 7 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून टेरीफ पत्र पाठवण्यात येणार आहे. नवीन टेरीफ 1 ऑगस्टपासून लागू होईल, असे ट्रम्प यांनी ट्रूथवरून स्पष्ट केले आहे.

चीन म्हणाले, ब्रिक्स कुठल्याही देशाविरोधात नाही

ट्रम्प यांच्या धमकीनंतर चीनने अतिशय संयमी भूमिका मांडली आहे. ब्रिक्स सहकार्य आणि विकासाचा मंच आहे. ब्रिक्स कोणत्याही देशाविरोधात नाही. टेरीफचा वापर राजकीय दबावासाठी करणे चुकीचे आहे. व्यापार युद्धात कुणीही विजेता नाही आणि टेरीफ हा काही मार्ग नाही, अशी भूमिका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते माओ निंग यांनी मांडली. दरम्यान, ब्राझीलमध्ये ब्रिक्स परिषदेत सदस्य देशांनी अमेरिकेचे नाव न घेताच टेरीफला कडाडून विरोध केला होता. तसेच जागतिक व्यापाराला होणाऱ्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली होती.

Comments are closed.