Iran US Israel War – इराणच्या लष्करी नेतृत्वाचा ‘गेम ओव्हर’, ट्रम्प यांचा तेहरानवर भयंकर हल्ल्याचा दावा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण, अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध आता धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहे. या युद्धादरम्यान अमेरिका सातत्याने इराणवर हल्ले करत आहे. आता अमेरिकन लष्कराने इराणची राजधानी तेहरानवर एक ‘मोठा हल्ला’ केला आहे. या हल्ल्यात इराणच्या अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले असून त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. या दाव्यामुळे आखाती देशातील परिस्थिती आणखी भयंकर होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर एका पोस्टद्वारे हा दावा केला आहे. तेहरानमध्ये झालेल्या हल्ल्यात इराणचे अनेक लष्करी अधिकारी, ज्यांनी सैन्याचे नेतृत्त्व केले त्यांचा अंत झाला आहे. तसेच तेहरामध्ये अनेक भागांचे नुकसान झाले आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. या पोस्टसोबत त्यांनी एक मिनिट सात सेकंदांचा व्हिडिओ देखील शेअर केला असून, त्यामध्ये तेहरान झालेले भीषण स्फोट दिसत आहे.

ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या 48 तासांच्या अल्टिमेटमनंतर हा हल्ला करण्यात आला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करा किंवा अमेरिकेसोबत करार करा, अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्यादरम्यान इराणच्या हद्दीत अमेरिकेची दोन लढाऊ विमाने पाडण्यात आली. त्यामुळे तणाव आणखी वाढला.

दोन दिवस सुरू असलेल्या शोध मोहिमेतून वैमानिकाला सुखरूप आणण्यात अमेरिकन लष्कराला य़श आले आहे. बेपत्ता वैमानिक दोन दिवस इराणच्या दुर्गम डोंगराळ भागात शत्रूपासून स्वतःचा बचाव करत लपून बसला होता. त्याच्यावर 24 तास पाळत ठेवण्यात आली होती. अमेरिकन लष्कराने या मोहिमेसाठी काही आधुनिक विमाने आणि शस्त्रे तैनात केली होती. बचाव कार्य सुरू असताना इराणच्या सैन्यासोबत अमेरिकन जवानांची मोठी चकमकही झाली. या मोहिमेत वैमानिक किरकोळ जखमी झाला असला तरी त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे ट्रम्प यांनी पोस्टद्वारे सांगितले आहे.

दरम्यान या युद्ध काळात वॉशिंग्टनमध्येही मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तात्काळ निवृत्त होण्याचे आदेश दिले आहेत. या अचानक घेतलेल्या निर्णयाचे कोणतेही अधिकृत कारण देण्यात आलेले नाही. मात्र, इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात होत असलेले नुकसान आणि वाढत्या खर्चामुळे ट्रम्प प्रशासनावर सध्या मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. परिणामी अमेरिकेने हे बदल केल्याचे बोलले जात आहे.

आम्ही त्याला परत आणलं! अमेरिकेच्या F15 लढाऊ विमानाच्या वैमानिकाची सुटका, इराणच्या हद्दीतून केलं रेस्क्यू

Comments are closed.