होर्मुझमध्ये इराणचे ड्रोन अमेरिकेने पाडले; युद्धविराम मोडल्याचा इराणचा आरोप, पुन्हा संघर्ष भडकण्याची भीती
इराण आणि अमेरिकेने युद्धविराम जाहीर केल्यानंतर शांत असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा पेटली आहे. अमेरिकेने इराणचे दोन ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेने ही कारवाई केली आहे. यानंतर इराणने संतप्त प्रतिक्रिया दिली असून अमेरिकेवर युद्धविराम मोडल्याचा आरोप केला आहे. यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी अमेरिका जबाबदार असेल, असा इशारा इराणने दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
इराण आणि अमेरिकेत युद्धविराम जाहीर झाल्यानंतर शांतता करारासाठी वाटाघाटी सुरू आहेत. दोन वेळा युद्धविरामाला मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र रविवारी अमेरिकेने इराणचे दोन ड्रोन पाडले. शनिवारीदेखील अमेरिकेने इराणचे चार ड्रोन पाडले होते. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱया जहाजांसाठी धोकादायक असल्यामुळे ड्रोन पाडल्याचे अमेरिकेने म्हटले. त्यावर इराणने संतप्त प्रतिक्रिया दिली. अमेरिकेने सीरिक आणि केशम द्वीप येथे किनारपट्टीवर असलेल्या रडारवरदेखील हल्ला करून युद्धविराम मोडल्याचा आरोप इराणने केला आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये एका पेट्रोल पंपावर दहशतवादी हल्ला झाला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानी मध्यस्थ इराणमध्ये दाखल
शांतता कराराबाबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानी मध्यस्थांचे एक शिष्टमंडळ इराणमध्ये दाखल झाले आहे. त्यात पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांचाही समावेश आहे. त्यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची भेट घेतली. पाकिस्तानचे सैन्य प्रमुख आसीम मुनीर यांचा संदेश इराणचे सर्वोच्च नेते मुजतबा खामेनी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इराणमध्ये आल्याचे मोहसीन नक्वी म्हणाले. यापूर्वी पाकिस्तानात झालेली शांतता वार्ता निष्फळ ठरली होती.
24 अब्ज डॉलरच्या संपत्तीवरून शांतता करार अडकला
इराण आणि अमेरिकेतील शांतता करार हा इराणची 24 अब्ज डॉलरची संपत्ती मुक्त करण्यावरून अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच अमेरिका इराणसाठी 12 अब्ज डॉलर रुपयांचा निधी देण्यास तयार नाही. यावरून इराणने अमेरिकेवर कडाडून टीका केली आहे. अमेरिकेकडून चर्चेदरम्यान सतत धोरण बदलत आहे. अमेरिकेचे अधिकारी वेगवेगळी वक्तव्ये करतात. त्यामुळे एका ठाम करारापर्यंत पोहोचणे कठीण झाल्याचे इराणने म्हटले आहे.
Comments are closed.