आखातातील युद्ध हिंदुस्थानच्या दारात पोहोचले,हिंद महासागरात इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडीतून हल्ला; 87 सैनिक ठार

आखाती देशांपुरते मर्यादित असलेले अमेरिका-इस्रायल व इराणमधील युद्ध आता हिंदुस्थानच्या दारात आले आहे. अमेरिकेने आज हिंद महासागरापर्यंत मजल मारत इराणच्या ‘आयरिस देना’ या युद्धनौकेवर हल्ला चढवला. पाणबुडीतून पाणतीर डागून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 87 जणांचा बुडून मृत्यू झाला. श्रीलंकेच्या नौदलाने 32 जणांचे प्राण वाचवले असून सुमारे 67 जण बेपत्ता आहेत.

श्रीलंकेच्या गॅले शहरापासून 40 नॉटिकल मैल (सुमारे 75 किलोमीटर) अंतरावर असताना युद्धनौकेवर हल्ला झाला. पाणतीर डागून एखादी युद्धनौका बुडवण्याची दुसऱया महायुद्धानंतरची ही पहिलीच वेळ आहे.

‘युद्धनौकेवर स्फोट झाल्यानंतर श्रीलंकन नौदल आणि तटरक्षक दलाकडे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आपत्कालीन मदतीची विनंती आली. त्यानंतर श्रीलंकन नौदलाने मदत व बचावकार्य हाती घेतले. या नौकेतून 32 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले असून 87 मृतदेह हाती लागले आहेत. शोधमोहीम अजूनही सुरू आहे, अशी माहिती श्रीलंका सरकारने दिली. ही नौका नेमकी कशामुळे बुडाली याची माहिती नसल्याचे श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिथा हेराथ म्हणाले.

केले शांत मरण!

अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेठ यांनी या हल्ल्याला दुजोरा दिला. ‘हिंद महासागरात आमच्या पाणबुडीने इराणी युद्धनौका बुडवली. शांत मरण दिले,’ असे हेगसेठ यांनी जाहीर पत्रकार परिषदेत सांगितले. हिंदुस्थानी नौदलाकडून या घडामोडींवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

होर्मुझची सामुद्रधुनी फक्त चीनसाठी खुली

अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यानंतर जगाचे नाक दाबण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय इराणने घेतला होता. कोणत्याही जहाजाने येथून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर हल्ल्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे जगाची 20 टक्के तेलवाहतूक बंद झाली. चीनने इराणला हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर इराणने हा मार्ग केवळ चीनसाठी खुला करण्याची घोषणा केली आहे.

खामेनींचे अंत्यसंस्कार लांबणीवर

अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेलेले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावरील अंत्यसंस्कार लांबणीवर टाकण्यात आले आहेत. त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते, मात्र खामेनी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता आहे. या गर्दीचे योग्य नियोजन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे इराणच्या सरकारी मीडियाने स्पष्ट केले, मात्र कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

आंतरराष्ट्रीय सागरी सरावासाठी विशाखापट्टणमला आले होते

अमेरिकेने लक्ष्य केलेली ‘आयरिस देना’ ही युद्धनौका हिंदुस्थानने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी झाली होती. फेब्रुवारी महिन्यात विशाखापट्टणम येथे झालेल्या या सरावात 72 देशांच्या नौदलांनी सहभाग घेतला होता. सागरी मैत्रीचा संदेश देणारा हा सराव संपवून ही नौका परतत होती.

मोजताबा खामेनी इराणचे नवे सर्वोच्च नेते?

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे पुत्र मोजताबा खामेनी यांचे नाव आघाडीवर आहे. इराणचा कारभार हाकण्यासाठी तेच योग्य असल्याचा मतप्रवाह आहे. त्यांच्या नावावर जवळपास एकमत झाले आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा खामेनी यांच्या अंत्यसंस्कारानंतरच होणार आहे.

अमेरिकेचे 650 सैनिक मारले! इराणचा दावा

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराणचे युद्ध आणखी तीव्र झाले असून अमेरिकेचे 650 सैनिक मारल्याचा किंवा जायबंदी केल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने आज केला. तसेच पहिल्या 48 तासांत आम्ही शत्रूवर 700 ड्रोन आणि शंभरहून अधिक मिसाईल्स डागल्याचेही ‘आयआरजीसी’ने स्पष्ट केले.

Comments are closed.