अमेरिका लवकरच व्हेनेझुएलावर हल्ला करणार आहे

कॅबिनेट बैठकीत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

कॅरेबियन समुद्रात कथित ड्रग तस्करांवर हल्ल्यानंतर अमेरिका आता लवकच्रा व्हेनेझुएलामध्ये थेट सैन्यमोहीम सुरू करणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंबंधी मोठे वक्तव्य केले आहे. अमेरिका अत्यंत लवकरच व्हेनेझुएलामध्ये राहणाऱ्या वाईट लोकांवर हल्ले करणे सुरू करणार आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो हे ड्रग तस्करीचे म्होरके असून त्यांना पद सोडण्यासाठी अल्टीमेटम दिला असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. तर अमेरिकेच्या संभाव्य सैन्यमोहिमेला मादुरो यांनी बळजबरीने सत्तापालट घडविण्याचा प्रयत्न ठरविले आहे.

व्हेनेझुएलाच्या भूमीवरही आम्ही कारवाई सुरू करणार आहोत. व्हेनेझुएलात वाईट लोक कुठे राहतात हे आम्हाला ठाऊक आहे. आम्ही अत्यंत लवकरच यासंबंधी निर्णय घेणार आहोत असे ट्रम्प यांनी कॅबिनेट बैठकीदरम्यान म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाकडून कॅरेबियनमध्ये कथित ड्रग तस्करी करणाऱ्या नौकांवर हल्ले करण्यास नौदलाला मंजुरी देण्यात आली आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 80 हून अधिक जण मारले गेले आहेत.

अमेरिकेच्या नौदलाने 2 सप्टेंबर रोजी कॅरेबियन समुद्रात एका संशयास्पद नौकेवर हल्ला केला होता. पहिल्या हल्ल्यात नौकेवर सवार सर्व लोक मृत्युमुखी न पडल्याने नौदलाने आणखी एक हल्ला केला होता. याप्रकारामुळे अमेरिकेच्या नौदलावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करण्यात येत आहे.

याप्रकरणी ट्रम्प यांनी अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेगसेथ यांचा बचाव केला आहे. दुसऱ्या हल्ल्याविषयी मला माहिती नव्हते.  सैन्याने एका नौकेला उडविले होते हे मला ठाऊक होते. हेगसेथ या कारवाईबद्दल संतुष्ट होते, परंतु दोन लोकांशी निगडित दुसऱ्या हल्ल्याविषयी जाणून नव्हतो असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

पहिला हल्ला आम्ही लाइव्ह पाहिला होता, परंतु त्यानंतर मी स्वत:च्या दुसऱ्या बैठकीसाठी निघून गेलो होतो. दुसऱ्या हल्ल्याविषयी काही तासांनी मला कळले होते. नौकेत आग लागलेली असताना मी कुणालाच जिवंत पाहिले नव्हते, याला फॉग ऑफ वॉर म्हटले जात असल्याचे युद्धमंत्री पीट हेगसेथ यांनी नमूद केले आहे.

Comments are closed.