जगावर मोठे संकट घोंघावतेय! कच्चे तेल 200 डॉलरवर जाणार? हुती बंडखोरांची बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीवर नाकेबंदी
आखाती देशांमध्ये युद्ध सुरूच असून अमेरिकेकडून इराणवर तीव्र हल्ले सुरू आहे. इराणही त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जगाच्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे २० टक्के पुरवठा करणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बंदमुळे आधीच जागतिक तेल आणि वायू संकट निर्माण झाले आहे. आता आणखी एका सामुद्रधुनीवर नाकोबंदी लादण्यात आल्याने हे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.
अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. हुती बंडखोरांनी आता बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीवर नाकेबंदी लादली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली असताना इराण-समर्थित हुती बंडखोरांनी तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असलेला दुसरा सागरी मार्ग बाब-अल-मंडेब सामुद्रधुनी रोखल्याचे वृत्त आहे. हे सौदी अरेबियासाठी केले गेले असले तरी, यामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येमेनच्या हुती बंडखोरांनी सौदी अरेबियाविरुद्ध तात्काळ प्रभावाने नौदल नाकेबंदी जाहीर केल्याने, सुरू असलेल्या अमेरिका-इराण युद्धाला एक नवीन वळण लागले आहे. या निर्णयामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेल आणि वायू जहाजांच्या वाहतुकीत मोठा अडथळा येण्याची शक्यता वाढली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असताना हे वृत्त आल्याने जगाची चिंता वाढली आहे.
आखाती देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाविरोधात हुतींनी केलेली ही कारवाई चिंतेचे कारण आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा आणि सागरी व्यापाराबद्दलची चिंता आणखी वाढू शकते. गेल्या आठवड्यात येमेनने बाब अल-मंदेब सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली होती आणि आता ती सौदी अरेबियासाठी बंद करण्यात आली आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीप्रमाणेच बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी ही जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची आहे. ती तांबड्या समुद्राला एडनच्या आखाताशी आणि हिंद महासागराशी जोडते. या सामुद्रधुनीतील अडथळ्यामुळे जागतिक सागरी वाहतूक विस्कळीत होऊ शकते, कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात.
जगातील सर्वात व्यस्त सागरी मार्गांपैकी एक असलेली बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी, सुएझ कालव्याचा दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणून काम करते आणि जागतिक सागरी व्यापारात तिचा वाटा अंदाजे १० ते १२ टक्के आहे, ज्यात ऊर्जा वाहतुकीचा मोठा हिस्सा आहे. अलीकडेच, इराणी वृत्तसंस्था ‘अल-फराह’चा हवाला देणाऱ्या काही वृत्तांनुसार, जर हा मार्ग बंद झाला तर कच्च्या तेलाच्या किमती २०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात.
बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी हिंदुस्थानसह देशांसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. हिंदुस्थान आपल्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीनंतर कच्चे तेल आणि एलएनजीच्या आयातीसाठी पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिकेच्या काही भागांवर अवलंबून आहे.
येमेनच्या नियंत्रणाखालील हा सागरी मार्ग हिंदुस्थानसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीइतकाच महत्त्वाचा आहे. हिंदुस्थानातील खाजगी आणि सार्वजनिक तेल शुद्धीकरण कंपन्या या मार्गाद्वारे दररोज शुद्ध केलेली पेट्रोलियम उत्पादने युरोपीय खरेदीदारांना पाठवतात. हिंदुस्थानचा सुमारे ९५ टक्के व्यापार सागरी मार्गाने होत असल्याने, बाब-अल-मंडेब युरोप, उत्तर अमेरिका आणि उत्तर आफ्रिकेकडे होणाऱ्या निर्यातीसाठी एक महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून काम करते.
सुएझ कालवा आणि बाब-अल-मंडेब सामुद्रधुनी मिळून हिंदुस्थानच्या एकूण परकीय व्यापारापैकी सुमारे ३५ टक्के व्यापार हाताळतात. कापड, तयार कपडे, औषधे, यंत्रसामग्री आणि बासमती तांदळासह कृषी उत्पादने यांसारख्या मोठ्या प्रमाणात निर्यात होणाऱ्या वस्तू या मार्गातून जातात. युरोपला निर्यात होणाऱ्या हिंदुस्थानी मालापैकी सुमारे ८० टक्के माल तांबड्या समुद्राच्या प्रदेशातून जातो. त्यामुळे हा मार्ग बंद झाल्यास जगावर मोठे संकट येणार आहे.
Comments are closed.