देश  विदेश -ड्रग्स तस्करांविरोधात अमेरिकी लष्कराचा स्ट्राइक

ड्रग्स तस्करांविरोधात अमेरिकी लष्कराचा स्ट्राइक

अमेरिकेने ड्रग्स तस्करांविरोधात पुन्हा एकदा जोरदार कारवाई केली आहे. प्रशांत महासागरातून ड्रग्स घेऊन जाणाऱ्या संशयित बोटींवर अमेरिकन लष्कराने स्ट्राइक केला. लष्कराच्या या हल्ल्यात 14 तस्करांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण बचावला आहे. हा व्यक्ती मेक्सिकोच्या ताब्यात राहील की अमेरिकेकडे सोपवले जाईल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. गेल्या सप्टेंबर महिन्यातही अमेरिकी लष्कराने ड्रग्स तस्करांविरोधात कारवाई केली.

ताजिकिस्तानमध्ये अडकलेले सात हिंदुस्थानी परतले

ताजिकिस्तानमध्ये अडकलेले सात हिंदुस्थानी सुखरूप मायदेशी परतले. हे सर्वजण ताजिकिस्तानच्या रोगुन शहरात अडकले होते. पंजाबच्या एका एजंटने या सर्वांना ड्रायव्हरची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांना ताजिकिस्तानात पाठवले होते. तेथे गेल्यानंतर ड्रायव्हरच्या नोकरीऐवजी त्यांना मजूर म्हणून कामाला ठेवले होते. तेथे त्यांना पगारही दिला जात नव्हता. भारतीय दूतावासाने ताजिकिस्तानमध्ये हा प्रश्न उपस्थित करून हिंदुस्थानी नागरिकांची सुटका केली.

अमेरिकेतील कर्मचारी कपातीला कोर्टाकडून स्थगिती

अमेरिकेत सुरू असलेल्या सरकारी शटडाऊनवेळी ट्रम्प प्रशासनाला झटका बसला आहे. सॅन फ्रान्सिस्कोच्या एका संघीय कोर्टाच्या न्यायाधीश सूसन इल्सटन यांनी ट्रम्प प्रशासनाच्या कर्मचारी कपातीला स्थगिती दिली आहे. ट्रम्प प्रशासनाकडून होत असलेली कपात अवैध आणि राजकीय हेतून प्रेरित आहे, असे कर्मचारी संघटनेने म्हटले होते. युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी कपातीला स्थगिती दिली.

जीएसटी नोंदणी आणखी सोपी होण्याच्या मार्गावर

जीएसटी आणखी सोपी करण्यासाठी पेंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. नव्या प्रणालीनुसार जीएसटी नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर फक्त कार्यालयीन कामकाजाच्या 3 दिवसांमध्ये मंजुरी मिळेल. सरकारद्वारे आणललेल्या जीएसटी सुधारणांतर्गत जीएसटी परिषदेने याला मंजुरी दिली आहे. नव्या नोंदणी प्रक्रिया पहिल्यापेक्षा अधिक सोपी होईल व मानवी हस्तक्षेप कमी होईल. कोणत्याही संभ्रमात न राहता नव्या धोरणांनुसार काम करावे आणि नव्या नियमांना लागू करावे, असे पेंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हटले.

Comments are closed.