धावपटू नाही, आता क्रिकेटपटू? उसेन बोल्टचे पहिले प्रेम पुन्हा उफाळले; लॉस एंजिल्स ऑलिम्पिकसाठी क्रिकेटची हाक

जगाने ज्याच्या पावलांखाली वारा धावताना पाहिलाय तोच वारा आता क्रिकेटच्या मैदानाकडे वळतोय. जमैकाचा महान धावपटू आणि जगातील सर्वात वेगवान माणूस असलेल्या उसेन बोल्टने क्रीडाविश्वाला थक्क करणारे संकेत दिले असून, 2028च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये तो पुनरागमन करणार आहे. पण धावपट्टीवर नाही, तर क्रिकेटच्या मैदानावर. त्याचे पहिले प्रेम पुन्हा उफाळून आल्यामुळे तो क्रिकेटच्या मैदानात धावताना दिसला तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. 128 वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये परतणाऱया क्रिकेटसोबत बोल्टची ही इच्छा सध्या क्रीडाप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

धावण्याचा बादशहा म्हणतोय, पहिलं प्रेम पुन्हा हाक देतंय! शालेय जीवनात वेगवान गोलंदाज असलेला बोल्ट पुन्हा एकदा हातात चेंडू घेऊन धावण्याची इच्छा बाळगून आहे. जमैका क्रिकेट मंडळाने संधी दिली तर मी क्रिकेटच्या मैदानात उतरायला सज्ज असेन.

धावण्याआधी क्रिकेटच!

उसेन बोल्टचे पहिले प्रेम क्रिकेट आहे हे फार मोजक्याच लोकांना माहीत असेल; पण आता ते अवघ्या जगाला कळलेय.
कॅरेबियन संस्कृतीत वाढलेला बोल्ट शालेय वयात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जायचा. त्याच्या क्रिकेट प्रशिक्षकानेच त्याला सांगितलं होतं की, तुझ्या पायात वीज आहे. धावण्याचा खेळ करून बघ आणि इथूनच खेळाच्या इतिहासाला नवी दिशा मिळाली!

तरीही बॅट, चेंडू आणि खेळपट्टीशी असलेले नाते कधीच तुटले नाही. क्रिकेट त्याच्यासाठी केवळ खेळ नव्हता, ती एक भावना होती. आणि भावना कधी निवृत्त होत नाहीत!

लॉस एंजेलिस 2028 ः क्रिकेटचे ऐतिहासिक पुनरागमन

लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट 1900 नंतर पुन्हा एकदा ऑलिम्पिक व्यासपीठावर झळकणार आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत प्रत्येकी सहा संघ, प्रत्येक संघात 15 खेळाडू म्हणजे एकूण 90 खेळाडूंचा थाट असेल.

फोन आला तर बूट बांधलेलेच आहेत!

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत बोल्टने मिश्किलपणे आपली इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, मी माझ्या क्रीडा कारकिर्दीवर समाधानी आहे. पण क्रिकेट? ते अजूनही मनात धावत असतं. अलीकडच्या काळातही बोल्ट क्रिकेटपासून दूर गेलेला नाही. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपचा तो ब्रँड दूत होता. तसंच हिंदुस्थानात युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांच्यासोबत मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यातही तो सहभागी झाला होता.

सम्राटाची अमर कामगिरी

उसेन बोल्ट म्हणजे विक्रमांची चालती-बोलती गाथा. त्याने ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्णपदके, 11 जागतिक विजेतेपदे. तसेच 100 मीटर (9.58 सेकंद) आणि 200 मीटर (19.19 सेकंद) या शर्यतीत न मोडणारे विश्वविक्रम रचलेत.

Comments are closed.