स्फोटके तयार करण्यासाठी ग्राइंडरचा वापर
दिल्लीस्फोट सूत्रधार मुझम्मीलच्या तपासातून उघड
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीमध्ये झालेल्या भीषण कार स्फोटाचा तपास वेगाने होत असून अनेक महत्वाच्या बाबी आतापर्यंत उघड झाल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारणाने (एनआयए) दिली आहे. या स्फोटातील एक मुख्य सूत्रधार मुझम्मील याने स्फोटकांचे संपृक्तीकरण करण्यासाठी धान्यांचे पीठ करणाऱ्या मिक्सर ग्राईंडर्सचा आणि मेल्टिंग मशिन्सचा उपयोग केला होता, असे आढळून आले आहे.
या माहितीमुळे तपासाला एक निश्चित दिशा मिळाली आहे. स्फोटक पदार्थ म्हणून अमोनियम नायट्रेटचा उपयोग करण्यात आला होता. हे अमोनियम नायट्रेट संपृक्त करण्यासाठी त्याचे चूर्ण करावे लागते. हे काम घरातल्या साध्या मिक्सर-ग्राईंडरचा उपयोग करून करण्यात आले. घरातच उपयोगात आणल्या जाणाऱ्या मेल्टिंग मशिनचेही साहाय्य घेतले गेले, अशीही महिती चौकशीत मिळाली आहे.
ग्राईंडर हस्तगत
एनआयएने हरियाणातील फरीदाबाद येथील धोज भागातून असे ग्राईंडर्स हस्तगत केले आहेत. याच ग्राईंडर्सचा उपयोग आधुनिक स्फोटके बनविण्यासाठी करण्यात येत होता, असे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. मुझम्मील हा युरियाचे चूर्ण करून त्याच्यापासून स्फोटके बनवित होता. युरियामध्ये अमोनियम नायट्रेटचे प्रमाण मोठे असते. ग्राईंडर आणि मेल्टिंग मशिन मुझम्मीलच्या कारचालकाकडून हस्तगत करण्यात आले आहे. त्याने ते स्फोटापूर्वी कारचालकाकडे दिलेले होते. ही दोन साधने मुझम्मीलनेच आपल्याकडे काही काळ ठेवण्यासाठी दिली होती, अशी कबुली या कारचालकाने प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे, असे समजते.
मेल्टिंग मशिनचा उपयोग
घरात उपयोगात आणले जाणारे इलेक्ट्रिक मेल्टिंग मशिन स्फोटक निर्मितीसाठी उपयुक्त असणारे काही पदार्थ वितळविण्यासाठी उपयोगात आणले गेले आहे. अशा प्रकारे घरातीलच साधनांचा उपयोग करून घातक स्फोटके बनविण्याचे तंत्रज्ञान या दहशतवाद्यांनी विकसीत केल्याचे प्राधिकरणाला तपासात आढळले आहे. या साधनांचा उपयोग मोठ्या प्रमाणात स्फोटकांची निर्मिती करण्यासाठी केले गेला होता काय, याचा तपास आता करण्यात येत आहे. स्फोटकनिर्मितीची ही पद्धती नेहमीपेक्षा नवी असल्याचेही एनआयएने आपल्या माहितीत स्पष्ट केले आहे.
साधने कोठून आणली
मुझम्मील याने ही साधने कोणाकडून विकत घेतली, याचा शोध आता घेतला जात आहे. मुझम्मीलने ही साधने खरेदी केल्याचे स्पष्ट झाले, तर त्याचा स्फोटातील सहभाग अधिक स्पष्ट होण्यास साहाय्य होणार आहे. सध्या प्राधिकरणाने मुझम्मीलवरच अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. कारण त्याने स्फोटक निर्मितीत तंत्रज्ञाची भूमिका साकारलेली होती. 2021 आणि 2022 या दोन वर्षांमध्ये तो ‘अन्सार गझवा हे हिंद’ या इस्लामी दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. ही संघटना भारताचे इस्लामीकरण करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. ही संघटना आयएसआयएस या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी भारतात काम करत आहे. मुझम्मीलचा या संघटनेशी परिचय एका इरफान ऊर्फ मौलवा नामक दहशतवाद्याने करून दिली होती. आता इरफानचाही शोध घेण्याचे काम प्राधिकारणाने हाती घेतले आहे. दहशतवाद्यांचे हे जाळे देशात अनेक स्थानी पसरले आहे, ते उखणून काढण्याचे मोठे आव्हान प्राधिकरणासमोर आहे, हे दिसत आहे.
आतापर्यंत 12 जणांना अटक
दिल्ली स्फोटप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी चारजण मुख्य सूत्रधार असल्याचे दिसून येत आहे. दहशतवाद्यांचे रॅकेट वेळीच उद्ध्वस्त करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला होता, हे आतापर्यंतच्या तपासावरुन स्पष्ट होत आहे. आणखी बाबी उघड होत आहेत.
Comments are closed.