मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत भाजपच्या पॅनेलचा धुव्वा, ‘ऊर्जा’ने दिला झटका… उषा तांबे अध्यक्ष, पॅनलचे 43 पैकी 31 उमेदवार विजयी

गिरगावातील प्रतिष्ठत आणि मराठी साहित्य व रंगभूमीची गेली नऊ दशके अखंड सेवा करणारी संस्था असलेल्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या पंचावार्षिक निवडणुकीत ऊर्जा पॅनेलने बाजी मारली. ऊर्जा पॅनेलच्या उषा तांबे अध्यक्षपदी विजयी झाल्या, तर याच पॅनेलचे पाच उपाध्यक्ष आणि 25 नियामक मंडळ सदस्य निवडून आले. या निवडणुकीत भाजपने ‘डॉ. भालेराव विचार मंच’च्या पाठी ताकद लावली होती. मात्र, मतदार ‘ऊर्जा’च्या पाठिशी उभे राहिले आणि भाजप पुरस्कृत’
‘भालेराव विचार मंच’चा धुव्वा उडाला. निकालाची अधिकृत घोषणा येत्या दोन ते तीन दिवसांत केली जाणार आहे.

मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत ऊर्जा पॅनेल आणि डॉ. भालेराव विचार मंच हे दोन गट आमनेसामने होते. ही निवडणूक साहित्यबाह्य कारणांनी गाजली. ‘भालेराव विचार मंच’ हे भाजप पुरस्कृत पॅनेल निवडणुकीत उतरल्याने या राजकीय घुसखोरीवर साहित्य वर्तुळातून नाराजी व्यक्त होत होती. त्यातच भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या मतदानाचा पह्टो व्हायरल झाला आणि त्यावरूनही अनेक प्रश्न समाज माध्यमांतून उपस्थित करण्यात आले. साहित्य संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया 17 सप्टेंबरला पूर्ण झाली आणि त्यानंतर दोन टप्प्यांत मतमोजणी झाली. नियामक मंडळात ऊर्जा पॅनेलचे 25 उमेदवार तर भालेराव विचार मंचचे 10 उमेदवार निवडून आले.

अॅड. यशोधन दिवेकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांनी दैनिक ‘सामना’ ला दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीसाठी 631 मतपत्रिका ग्राह्य धरण्यात आल्या. 10 ते 12 मतपत्रिका बाद करण्यात आल्या. यामध्ये काही चुकीचे मार्ंकग झालेल्या तसेच हयात नसलेल्या व्यक्तींच्या व देशाबाहेरील व्यक्तींच्या मतपत्रिका होत्या. योग्य पडताळणी व शहानिशा करून या मतपत्रिका बाद करण्यात आल्याचे अॅड. दिवेकर यांनी सांगितले. शरद पवार यांच्या मतपत्रिकेचा कोणताही वाद नव्हता, त्यांची मतपत्रिका नियमानुसार असल्याने ती ग्राह्य धरल्याचे अॅड. दिवेकर यांनी सांगितले.

निकाल याप्रमाणे…

  • अध्यक्षपदाच्या लढतीत ऊर्जा पॅनेलच्या उषा तांबे विजयी झाल्या. त्यांना 334 मते पडल्याचे समजते. त्यांचे प्रतिस्पर्धी किशोर रांगणेकर यांना 291 मते पडली.
  • उपाध्यक्षपदाच्या लढतीत ऊर्जा पॅनेलचे विजय पेंकरे, अशोक कोठावळे, रेखा नार्वेकर, डॉ. अनिल बांदिवडेकर, सुदेश हिंगलासपुरकर विजयी झाले, तर भालेराव विचार मंच पॅनेलचे जयराज साळगांवकर, मधुकर वर्तक विजयी झाले.
  • n नियामक मंडळात ऊर्जा पॅनेलचे ज्ञानेश पेंढारकर, मोनिका गजेंद्रगडकर, डॉ. अश्विनी भालेराव-गांधी, चंद्रशेखर गोखले, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, डॉ. अमेय पुरंदरे, सुहासिनी किर्तीकर, प्रा. मिलिंद जोग, प्रतिभा सराफ, प्रतिभा बिस्वास, सुबोध (गणेश) आचवल, ज्योती कपिले, अरुण फडके, सावित्री हेगडे, मनन भालेराव, अनुपमा उजगरे, धनश्री धारप, प्रियांका बांदिवडेकर, एकनाथ आव्हाड, मीनाक्षी जयकर, अरुण जोशी, संगिता अरबुने, अर्पणा साठे, दीपाली भागवत, सुभाष भागवत असे 25 जण निवडून आले. भालेराव विचार मंच पॅनेलचे प्रमोद पवार, चंद्रशेखर वझे, डॉ. नरेंद्र पाठक, दिलीप भाटवडेकर, विजयराज बोधनकर, गीतेश शिंदे, रवींद्र गोळे, प्रकाश कामत, विकास परांजपे, चंद्रकांत भोंजाळ हे 10 जण नियामक मंडळ सदस्य म्हणून निवडून आले. या निकालाची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे.

Comments are closed.