‘टिप टिप बरसा पाणी’ पासून ‘तुझे देखा तो…’ पर्यंतचा प्रवास – Tezzbuzz
आनंद बक्षी (Anand Bakshi) हे आपल्या काळातीळ खूपच लोकप्रिय गीतकार होते. त्यांनी साध्या, सोप्या शब्दांत भावनांना अशा पद्धतीनं मांडलं की ते थेट लोकांच्या मनाला भिडलं.
बॉलिवूडमध्ये काही गीतकार असे आहेत ज्यांनी आपल्या शब्दांतून भावना थेट लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवल्या.आनंद बक्षी हे अशा मोजक्या गीतकारांपैकी एक होते. आपल्या सुमारे 40 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी 4,000 पेक्षा जास्त गाणी लिहिली.आनंद बक्षींच्या गाण्यांची खासियत म्हणजे ते अगदी साध्या,आपल्या रोजच्या बोलण्याच्या भाषेतले असायचे. पण तरीही त्यातल्या भावना अगदी मनाला भिडायच्या मग ते प्रेम असो,दुःख,मैत्री किंवा देशभक्ती,त्यांनी सगळं खूप सुंदर शब्दांत मांडलं.
पण इतकं यश मिळूनही, एक वेळ अशी आली की त्यांना त्यांच्या एका गाण्याबद्दल खंत वाटली. ही गोष्ट 1983 साली आलेल्या ‘अंधा कानून’ या चित्रपटाशी जोडलेली आहे. त्यांच्या मुलाने राकेश आनंद बक्षीने त्यांच्याबद्दलच्या ‘नग्मे, किस्से, बातें, यादें’ या पुस्तकात हे सांगितलं आहे.या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुस्लिम व्यक्तिरेखा साकारली होती. ते ‘जां निसार खान’ या भूमिकेत होते जे आधी वन विभागात अधिकारी होते. पण एका शिकाऱ्याच्या खुनाचा खोटा आरोप त्यांच्यावर लावला गेला आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं.
‘नग्मे, किस्से, बातें, यादें’ या पुस्तकात असं सांगितलं आहे की दिग्दर्शकाने आनंद बक्षी यांना चित्रपटाची गोष्ट अमिताभ बच्चन यांच्या नावाने सांगितली,पण हे सांगितलं नाही की अमिताभ या चित्रपटात मुस्लिम पात्र साकारत आहेत.आनंद बक्षी यांनी या चित्रपटासाठी एक गाणं लिहिलं होतं,जे खूपच प्रसिद्ध झालं. त्या गाण्याच्या ओळी होत्या,”रोते-रोते हंसना सीखो, हंसते-हंसते रोना,जितनी चाभी भरी राम ने, उतना चले खिलौना…”. या गाण्यात “राम” हा शब्द भगवान राम संदर्भात वापरला गेला होता.पण जेव्हा बक्षी साहेबांना कळलं की अमिताभ बच्चन या चित्रपटात मुस्लिम पात्र करत आहेत, तेव्हा त्यांना खूप खंत वाटली. त्यांनी ही गोष्ट आपल्या मुलाला सांगितली.
त्यांच्या मुलाने पुस्तकात लिहिलंय की वडील म्हणाले,”माझी चूक झाली, गाणं लिहिण्याआधी मी दिग्दर्शकाला विचारलंच नाही की हिरो कोण आहे आणि त्याचा धर्म काय आहे.दिग्दर्शक फक्त ‘अमिताभ’ असं सांगत होता.जर मला माहिती असतं की तो मुस्लिम पात्र करत आहे,तर मी त्या पात्राच्या धर्म आणि संस्कृतीनुसार गाण्याचे शब्द लिहिले असते”. आनंद बक्षी यांचा जन्म 21 जुलै 1930 रोजी रावळपिंडीमध्ये झाला (जे आता पाकिस्तानमध्ये आहे). फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात आलं आणि लखनऊमध्ये राहायला लागलं. लहानपणापासूनच त्यांना शब्दांची आणि गाण्यांची खूप आवड होती. चित्रपटात काम करायचं स्वप्न होतं, म्हणूनच त्यांनी नौदलात नोकरी पत्करली कारण त्यांना मुंबईला यायचं होतं. मुंबईमध्ये येऊन सिनेसृष्टीत स्वतःचं नाव कमवायचं, हाच त्यांचा खरा हेतू होता.त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1958 साली ‘भला आदमी’ या चित्रपटासाठी गाणी लिहून केली. त्यावेळी त्यांना 4 गाण्यांसाठी फक्त 150 रुपये मिळाले होते.
पण खूप मेहनत घेतल्यानंतर त्यांना खरी ओळख 1965 साली ‘जब जब फूल खिले’ या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटासाठी त्यांनी ‘ये समां समां है ये प्यार का’, ‘परदेसियों से ना अखियां मिलाना’ आणि ‘एक था गुल और एक थी बुलबुल’ ही सुंदर गाणी लिहिली.चार दशकांच्या करिअरमध्ये आनंद बक्षी यांनी अशी गाणी लिहिली जी आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. ‘मेरे महबूब कयामत होगी’, ‘चिट्ठी न कोई संदेश’, ‘चांद सी महबूबा हो मेरी’, ‘झिलमिल सितारों का’, ‘सावन का महीना’, ‘मैं शायर तो नहीं’, ‘झूठ बोले कौआ काटे’, ‘कोरा कागज था ये मन मेरा’, ‘तुझे देखा तो ये जाना सनम’, ‘हमको हमी से चुरा लो’, ‘उड़ जा काले कावां’, ‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो’, ‘रूप तेरा मस्ताना’, ‘टिप टिप बरसा पानी’, ‘इश्क बिना क्या जीना यारों’ अशी कितीतरी सुपरहिट गाणी त्यांच्या नावावर आहेत.
आनंद बक्षी यांचं आयुष्य संघर्षाने भरलेलं होतं, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. ३० मार्च २००२ रोजी ते कायमचे आपल्यातून निघून गेले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
चाहत्याने व्हिडिओ काढला म्हणून रागावला अक्षय; माेबाईल हिसकवला! नंतर…!
Comments are closed.