संत तुकाराम महाराजांचे अभंग जीवनास देती रंग; अभंग तुकाराम’ चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत योगेश सोमण – Tezzbuzz
‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा अखंड नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… अशा भक्तिमय वातावरणात अवघी देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अमृतरुपी अभंगाचे साक्षीदार होत श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज यांचे सगुण साकार रूप प्रत्यक्ष अवतरलं. निमित्त होतं… ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातील कलाकारांच्या देहू भेटीचं.
पावसाच्या हलक्या शिडकावातही भक्ती, श्रद्धेच्या वर्षावाने रंग भरले अन् जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा दर्शन सोहळा उपस्थितांनी याप्रसंगी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला. डोक्यावर वारकरी पगडी, कपाळावर टिळा, गळ्यात माळा आणि हातात चिपळ्या असा वेष परिधान करून ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेच्या रूपातील दर्शन यावेळी दिलं. ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची भूमिका साकारणार असून त्यांच्या पत्नीच्या आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे.
संत तुकाराम महाराज अवघ्या महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगरूपी अमृतवाणीने जीवनाची शाश्वत सत्ये सांगितली आणि जगण्याचे तत्त्वज्ञान मांडले. मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणारा हा सुखसंवाद आता ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथा ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातून आपल्या समोर आणणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात, ‘तुकारामांच्या अभंगांमध्ये अध्यात्मिकतेचा साक्षात्कार आणि जीवनाची अर्थपूर्णता याचं अत्यंत सुंदर सार दडलेलं आहे. जगद्गुरूंचे हे तत्वज्ञान नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून आमच्या या प्रयत्नांना पॅनोरमा स्टुडिओज या निर्मिती संस्थेची भक्कम साथ लाभली आहे. त्यासाठी मी त्यांच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे.
लोकसाहित्य, लोकसंगीत आणि लोकजीवनाचा अर्क प्रादेशिक सिनेमांमध्ये पुरेपूर उतरलेला असल्याने प्रेक्षकांना ते अधिकच जवळचे वाटतात. एका चांगल्या संकल्पने सोबतच उत्तम चित्रपटांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी पॅनोरमा स्टुडिओज नेहमीच कटिबद्ध असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन कुमार मंगत पाठक यांनी सांगितले.
दर्जेदार संहिता आणि उत्तम कलावंत यामुळे चित्रपटासोबत आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे सीईओ (डिस्ट्रीब्युशन आणि सिंडिकेशन) मुरलीधर छतवानी यांनी सांगितले.
‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून आपला वारकरी संप्रदायाचा अभ्यास सिद्ध केलेले दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल १० अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.
मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी , अजय पुरकर, अवधूत गांधी, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचन्द्र, नुपूर दैठणकर, अजिंक्य राऊत, निखिल राऊत, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, ईश्मिता जोशी, रुद्र कोळेकर, अभीर गोरे, तेजस बर्वे आदि कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.
चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांचे आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांची आहे. व्ही एफ. एक्स ची जबाबदारी शॉक अँड ऑ फिल्म्स यांनी तर व्हिजुअल प्रमोशनची जबाबदारी कॅटलिस्ट क्रिएटस यांनी सांभाळली आहे. सिनेमन एंटरटेनमेंटचे जय गोटेचा मार्केटिंग डायरेक्टर आहेत. कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
यंदा शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या घरी होणार नाही गणपती उत्सव, अभिनेत्रीने सांगितले कारण
Comments are closed.