तान्या मित्तलची खिल्ली उडवल्यानंतर ट्रोल्सच्या रडारवर आली कॉमेडियन; अखेर सोशल मीडियाला का दिला रामराम? – Tezzbuzz
जवळपास तीन दशकांपासून बॉलिवूडमध्ये विनोदाचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे जॉनी लीवर यांची मुलगी जेमी लीवरही तिच्या जबरदस्त कॉमिक टायमिंगमुळे प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. चित्रपट, वेब सीरिज आणि टीव्ही शोमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, अलीकडेच जेमीने सोशल मीडियाला अलविदा म्हटल्याने चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
अलीकडेच बिग बॉस १९ च्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये जेमी लिव्हरने विशेष उपस्थिती लावली होती. फराह खानची नक्कल करत तिने प्रेक्षकांना खळखळून हसवले. घरातील स्पर्धकांवर विनोदी शैलीत टोलेबाजी करत तिने संपूर्ण एपिसोड रंगतदार केला.
या दरम्यान तिने स्पर्धक तान्या मित्तलवर (Tanya Mittal)केलेल्या विनोदांमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. काहींना तिचा अभिनय आवडला, तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जेमीने तान्याच्या लूक आणि हावभावांची नक्कल करणारा आणखी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामुळे टीका अधिक वाढली. या पोस्टनंतर तिला मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रतिक्रिया सहन कराव्या लागल्या.
या सगळ्या घडामोडींनंतर जेमी लिव्हरने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. तिने एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.जेमीने लिहिले की, “जे मला खऱ्या अर्थाने ओळखतात, त्यांना माहीत आहे की मला माझं काम किती आवडतं आणि मी ते किती प्रामाणिकपणे करते. लोकांना आनंद देण्याची संधी दिल्याबद्दल मी देवाची कायम आभारी आहे. पण या प्रवासात हेही शिकलं की प्रत्येक जण तुमच्यासोबत हसणारच असं नाही.”
तिने पुढे सांगितले की अलीकडच्या काही घटनांमुळे तिला स्वतःचा एक भाग हरवल्यासारखं वाटू लागलं आहे. ही भावना रागातून नव्हे, तर आत्मपरीक्षणातून आली असल्याचं तिने स्पष्ट केलं.
“मला माझं काम खूप प्रिय आहे आणि मी लोकांचं मनोरंजन करत राहीन. मात्र सध्या थोडी विश्रांती घेऊन स्वतःला पुन्हा सावरण्याची गरज आहे,” असं तिने पोस्टमध्ये नमूद केलं.
जेमीने चाहत्यांना आश्वासन दिलं आहे की ती पुढील वर्षी पुन्हा नव्या ऊर्जेसह परतणार आहे. सध्या ती सुट्टीवर असून स्वतःकडे लक्ष देत असल्याचं तिने सांगितलं. जेमी लीवर ही ज्येष्ठ विनोदी कलाकार जॉनी लीवर यांची कन्या असून, तिने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजनसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. अलीकडेच ती कपिल शर्मा अभिनीत ‘किस किसको प्यार करूं २’ या चित्रपटात झळकली होती. याआधीही तिने अनेक चित्रपट आणि प्रोजेक्ट्समधून प्रभावी भूमिका साकारल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.