उत्तर प्रदेश भाजपने तयारी सुरू केली आहे.
पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, यावर चर्चा
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीस सज्ज होण्यास प्रारंभ केला आहे. ही निवडणूक येत्या मार्च-एप्रिलमध्ये होणार आहे. उत्तर प्रदेशप्रमाणेच पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पाचही राज्यात भारतीय जनता पक्षाने आपली संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास प्रारंभ केल्याचे वृत्त आहे.
या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उत्तर प्रदेशात कोण असेल, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भारतीय जनता पक्ष योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदी राहू देणार नाही, असा प्रचार समाजवादी पार्टी आणि काँग्रेसकडून केला जात आहे. तथापि, ही निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वात पक्ष साकारणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कोण होणार, हे निवडणुकीनंतर नवनिर्वाचीत आमदार ठरवितील. हीच पद्धती भारतीय जनता पक्षात अवलंबिली जाते, असे प्रतिपादन पक्षाच्या राज्य शाखेचे अध्यक्ष पंकज चौधरी यांनी बुधवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना केले.
भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष
भारतीन जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षातील निर्णय प्रक्रिया भिन्न आहे. या पक्षात एका घराण्याकडून किंवा त्याच घराण्यात जन्माला आलेल्या व्यक्तींकडून निर्णय घेतले जात नाहीत. आमचा पक्ष पक्षांतर्गत लोकशाहीवर विश्वास ठेवतो. तथापि, प्रचार कार्य सुरळीत व्हावे, यासाठी निवडणूक कोणाच्या नेतृत्वात होणार हे आधी ठरविले जाते. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार, हे पक्षाचा विजय झाल्यानंतर नवे लोकप्रतिनिधी निर्धारीत करतात. त्यामुळे उत्तर प्रदेशचे पुढचे मुख्यमंत्री कोण, या प्रश्नाचे उत्तर आत्ताच देता येणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.
आदित्यनाथ यांची कामगिरी कौतुकास्पद
योगी आदित्यनाथ हे गेली जवळपास 10 वर्षे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी आहेत. या काळात त्यांनी राज्यात प्रचंड प्रमाणात व्यवस्था सुधारली आहे. पूर्वी उत्तर प्रदेश हे ‘आजारी’ राज्य म्हणून ओळखले जात असे. मात्र, आता ते प्रगतीपथावरील राज्य म्हणून ओळखले जात आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात सुधारली असून पायाभूत सुविधांच्या विकासावरही मोठा भर देण्यात आला आहे. नव्या महामार्गांपैकी सर्वाधिक मार्ग उत्तर प्रदेशातच आहेत. शिक्षण, आरोग्य आणि इतर महत्वाच्या क्षेत्रांमध्येही प्रगती करण्यात आली आहे. त्यामुळे आदित्यनाथ हे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून परिचित आहेत. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे, अशी भलावण पंकज चौधरी यांनी पत्रकारांसमोर केली.
राम मंदिराचा परिणाम
गेल्या एक महिन्यापासून अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या दान धनाच्या अपहाराचा प्रश्न गाजत आहे. हा प्रश्न भारतीय जनता पक्षासाठी अडचणीचा ठरेल, असे विरोधी पक्षांना वाटत आहे. तथापि, उत्तर प्रदेशातील जनता मुख्यत्वेकरुन कायदा-सुव्यवस्था आणि विकास या मुद्द्यांवर मतदान करेल आणि भारतीय जनता पक्षालाच पुन्हा यशस्वी करेल, असा विश्वासही पंकज चौधरी यांनी व्यक्त केला.
लवकर निवडणूक होणार का…
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक नोव्हेंब-डिसेंबरमध्ये होईल, अशीही चर्चा आहे. मात्र, ती पूर्वनिर्धारीत वेळेतच होईल, असा विश्वास पंकज चौधरी यांनी व्यक्त केला. विरोधी पक्ष केवळ वेगवेगळ्या मुद्द्यांवर केवळ अफवा पसरविण्याचे काम करीत आहेत. त्यांना आपले भवितव्य कळून चुकले आहे. त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यामुळे ते स्वत:संबंधी विधाने करण्याऐवजी आणि आपण काय करणार हे स्पष्ट करण्याऐवजी केवळ भारतीय जनता पक्षावर तोंडसुख घेण्यात मग्न आहेत. जनता त्यांना जवळ करणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पडघम लागले वाजू…
ड भारतीय जनता पक्षाने कसली उत्तर प्रदेशाठी कंबर, बांधणीला केला प्रारंभ
ड विधानसभा निवडणूक योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वात होण्याची निश्चित
ड मोठ्या यशाचा भारतीय जनता पक्षाला आत्मविश्वास, संघटनाही उत्साहित
Comments are closed.