उत्तराखंडचे अर्थमंत्री अग्रवाल यांनी राजीनामा दिला
‘पहाडी’ विधानावरून गोंधळ
वृत्तसंस्था/ देहराडून
उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रेमचंद अग्रवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रेमचंद अग्रवाल हे ऋषिकेशचे भाजप आमदार आहेत. धामी सरकारमध्ये त्यांच्याकडे संसदीय कामकाज, नगरविकास आणि अर्थमंत्री ही खाती होती. गेल्या महिन्याच्या अखेरीस सभागृहाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अग्रवाल यांनी ‘पहाडी’ भागासंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील डोंगराळ भागातील लोक संतप्त झाले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे निदर्शने होण्यासोबतच प्रतिमेचे दहनही करण्यात आले होते.
प्रेमचंद अग्रवाल यांना उत्तराखंड मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा मुद्दा गेल्या काही काळापासून जोर धरत होता. भाजपचे मुख्य प्रवक्ते अनिल बलुनी यांनीही मंत्र्यांनी विधानसभेत राज्यातील डोंगराळ भागातील लोकांविरुद्ध केलेल्या अलीकडील विधानाला ‘दु:खद आणि दुर्दैवी’ म्हटले होते. विरोधी आमदारांसोबतच्या चर्चेदरम्यान अग्रवाल यांनी आक्षेपार्ह शब्दही वापरले होते. उत्तराखंड सरकारमध्ये अग्रवाल यांनी अर्थ आणि संसदीय कामकाज यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती.
Comments are closed.